अयोध्या : राममंदिराच्या उभारणीसाठी प्रयत्न करायला हवेत. रामायण संग्रहालयासारख्या लॉलीपॉपने काही होणार नाही, अशी टीका भाजपचे उत्तरप्रदेशातील खासदार आणि रामजन्मभूमी आंदोलनातील नेते विनय कटियार यांनी केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या नियोजित रामायण संग्रहालयावर केली आहे. लोकसभेत आपले बहुमत असल्याने सरकारने राममंदिर बांधण्यासाठी कायदा आणावा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. अयोध्येपासून १५ कि.मी. अंतरावर केंद्र सरकार हे संग्रहालय उभारणार असून राज्य सरकारने त्यासाठी भूमी उपलब्ध करून दिली आहे.
कटियार पुढे म्हणाले की, केंद्रीय सांस्कृतिकमंत्र्यांंच्या या संदर्भातील कार्यक्रमाला मी उपस्थित रहाणार नाही; कारण अयोध्येतील संत, महंत आणि लोक मला राममंदिराविषयी विचारतील. अयोध्येत विकासकामे केली आहेत. तेथे साडेसहा सहस्र मंदिरे आहेत; मात्र आम्हाला राममंदिर हवे आहे. राममंदिराविना अयोध्या अपूर्ण आहे.
विनय कटियार यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, राज्य सरकार राममंदिरासाठी काहीच हालचाल करत नाही. याच सरकारने मंदिरासाठी आवाज उठवणार्या कारसेवकांची हत्या केली होती. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह सर्वजण राममंदिराच्या नावे आमच्या हाती लॉलीपॉप देण्याचा प्रयत्न करत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात