मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगद्गुरु नरेंद्र महाराज यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावून धर्मसत्ता ही राजसत्तेपेक्षा श्रेष्ठ आहे, अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. या संदर्भात १७ ऑक्टोबर या दिवशी महाराष्ट्र १ या वाहिनीने चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये सहभागी होण्यासाठी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनाही निमंत्रित करण्यात आले होते; मात्र आझाद मैदान दंगलप्रकरणी केलेल्या एका वक्तव्यावरून चर्चासत्राचे सूत्रसंचालक निखिल वागळे यांनी अपमानास्पद वागणूक देऊन श्री. अभय वर्तक यांना कार्यक्रमातून निघून जाण्यास सांगितले.
(सभाशास्त्राचे साधे नियमही न पाळणारी महाराष्ट्र १ वाहिनी चर्चांमधून समाजाला काय विधायक संदेश देत असेल, याचा विचारच न केलेला बरा. सूत्रसंचालकाने चर्चेत सहभागी झालेल्या वक्त्यांचे म्हणणे पूर्ण आणि तटस्थ राहून ऐकून घेणे अपेक्षित असते. असे न करता स्वतःच्या मताच्या विरोधात मते मांडणार्यांच्या अंगावर ओरडून त्याचे म्हणणे बंद पाडून त्यांना वाहिनीवरून जाण्यास सांगणे, ही सभ्यता नव्हे ! एरवी विचारांचा लढा विचारांनी द्यावा असे दृष्टीकोन देणारे स्वतःच इतरांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी करत आहेत, असेच नव्हे का ? संपादक, दैनिक सनातन प्रभात )
१. चर्चासत्राच्या वेळी अंनिसचे अविनाश पाटील यांच्याकडून वारंवार जगद्गुरु नरेंद्र महाराज यांचा भोंदू असा उल्लेख करून त्यांची अपकीर्ती करण्यात येत होती.
२. त्यावर श्री. अभय वर्तक यांनी जगद्गुरु नरेंद्र महाराज यांना भोंदू म्हणणारी अंनिस मदर तेरेसा यांना भोंदू असे संबोधत नाही. यावरूनच अंनिसचा हिंदुत्वाविषयी द्वेष दिसून येतो, अशा आशयाचे विधान केले होते. यावर अविनाश पाटील निरुत्तर झाल्याने ते विषयांतर करून पुन्हा जगद्गुरु नरेंद्र महाराजांविषयी अनुचित वक्तव्ये करू लागले.
३. त्यावर श्री. अभय वर्तक यांनी अंनिसचा भोंदूपणा उघडा पाडण्यासाठी आझाद मैदानावर रझा अकादमीने घातलेल्या हैदोसाचे उदाहरण दिले. या दंगलीच्या वेळी अनेक महिला पोलिसांचा विनयभंग झाला होता. यासंदर्भात श्री. वर्तक यांनी विषय उपस्थित करतांच निखिल वागळे यांनी श्री. वर्तक यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.
४. श्री. वर्तक यांचे सूत्र पूर्ण ऐकून न घेता वागळे यांनी या व्यासपिठाचा वापर करून तुम्हाला खोटेपणा करू देणार नाही. तुम्ही येथून निघून जा. यापुढे मी सनातनच्या प्रतिनिधीला इथे उपस्थित राहू देणार नाही. तुम्ही बाहेर निघा, अशी अपमानास्पद वक्तव्ये केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात