सनातन संस्थेद्वारे आदर्श पद्धतीने दिवाळी साजरी करण्याविषयी प्रबोधन
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) : दुसर्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेने जपानवर अणुबाँब टाकला. यानंतर आज जपानमध्ये अमेरिकेतील सुईपण विकली जात नाही. उरी आक्रमणानंतर पाकिस्तानच्या विरोधात सर्वच भारतियांच्या भावना तीव्र आहेत. अशा पाकिस्तानला आज चीन साहाय्य करत आहे. त्यामुळे जपानचा आदर्श ठेवत राष्ट्रप्रेमी नागरिकांनी फटाक्यांसह चीनच्या सर्वच उत्पादनांवर बहिष्कार घालावा, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. गजानन पाटील यांनी केले. येथील दत्त मंगल कार्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फटाके विषयाच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष पाटील, सनातन संस्थेच्या सौ. मधुरा तोफखाने आणि हिंदू विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या (सौ.) भारती जैन उपस्थित होत्या. या वेळी बोलतांना श्री. संतोष देसाई म्हणाले, फटाक्यांमुळे केवळ प्रदूषणच होते असे नाही, तर आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. जो पैसा देशकार्यासाठी वापरणे अपेक्षित आहे, त्याचा विनियोग अयोग्य कारणासाठी होतो. त्यामुळे राष्ट्रप्रेमी नागरिकांनी फटाके वापरणे टाळले पाहिजे, तसेच शासनानेही या संदर्भात लक्ष घालून कठोर कायदे करावेत. सनातन संस्थेच्या सौ. मधुरा तोफखाने म्हणाल्या, सनातन संस्थेच्या वतीने केवळ फटाके नको, असे प्रबोधन करण्यात येत नाही, तर आदर्श पद्धतीने दिवाळी कशी साजरी करावी, याचेही प्रबोधन करण्यात येते. शाळा-महाविद्यालय येथे प्रबोधन, नागरिकांचे प्रबोधन, शासनाला निवेदन या माध्यमांतूनही जागृती करण्यात येत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात