सांगली : नवरात्रोेत्सवाच्या निमित्ताने रणरागिणी शाखेच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आले. यात नवरात्रोत्सव आणि देवीपूजनामागील शास्त्र सांगणे, याच समवेत कुंकूमार्चन, घागर फुंकणे, गरबा, भोंडला यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आणि या कृती भाविक महिलांकडून करवून घेण्यात आल्या. हे कार्यक्रम कुरुंदवाड (जिल्हा कोल्हापूर), विश्रामबाग-सांगली येथे सौ. कांचन सूर्यवंशी यांच्या घरी, तसेच श्री. रमेश खिलारे यांच्या घरी घेण्यात आले. शास्त्रोक्त पद्धतीने नवरात्र साजरा केल्याने खूप आनंद मिळाला, अशी प्रतिक्रिया अनेक महिलांनी व्यक्त केली. तसेच बोरगाव येथेही प्रवचन घेण्यात आले. या सर्व ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांचा लाभ ३०० हून अधिक भाविक महिलांनी घेतला. बोरगाव येथे धर्मशिक्षण वर्गाची मागणी असून दिवाळीचे प्रवचन घ्यावे, अशी मागणीही करण्यात आली.
विश्रामबाग येथे बोलतांना सौ. सूर्यवंशी यांच्या घरी झालेल्या कार्यक्रमात सौ. गौरी खिलारे म्हणाल्या, “नवरात्रीच्या कालावधीत आपल्यातील दोष आणि अहंरूपी असुरांचा नाश करण्यासाठी, तसेच राष्ट्र आणि धर्म यांवर आघात करणार्या महिषासुराचा नाश होण्यासाठी आदिशक्तीची उपासना करणे आवश्यक आहे. अलीकडच्या काळात महिलांना शास्त्र माहीत नसल्याने अनेक ठिकाणी चित्रपटातील गीतांवर अंगविक्षेप करत नृत्य करतात. अशा बाबींमुळे देवीचा अवमान होतो, तरी अशा अयोग्य कृती आपण प्रयत्नपूर्वक टाळल्या पाहिजेत.”
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात