हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन
अमरावती : सध्या आपण नवीन किल्ले बांधू शकत नाही; परंतु असलेल्या किल्ल्यांचे तरी जतन करायला हवे. किल्ल्यांवरील शिवरायांच्या आठवणी पुसल्या जात आहेत. असे असतांनाही पुरातत्व खाते स्वतः लक्ष घालून त्यांचे संरक्षण करत नाही. त्यामुळे आम्हाला आंदोलन करावे लागते, मग त्या पुरातत्व खात्याचे कामच काय ? ते खातेच बंद करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन येथील हिंदु महासभेचे श्री. नितीन व्यास यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे २३ गडकोट अजूनही खाजगी मालमत्तेचा भाग आहेत. त्यांना पुरातत्व खात्याने स्वतःच्या कह्यात घेऊन संरक्षण द्यावे, तसेच चिनी बनावटीचे फटाके वापरू नयेत, या मागण्यांसाठी १८ ऑक्टोबरला दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत राजकमल चौकात राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री योग वेदांत सेवा समिती, भगवे वादळ या संघटनांसह एकूण ४२ कार्यकर्ते उपस्थित होते.
मान्यवरांचे मार्गदर्शन
राष्ट्रहित म्हणजेच सर्वांचे हित ! – श्री. मानव बुद्धदेव, श्री योग वेदांत सेवा समिती
पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांनीही फटाक्यांना विरोध केला आहे. ती आपली संस्कृतीच नाही. त्यामुळे राष्ट्रहिताचा विचार करता फटाके फोडू नका.
किल्ले नष्ट होण्याच्या मार्गावर ! – श्री. अभिषेक दीक्षित, श्री शिवप्रतिष्ठान
शिवरायांच्या किल्ल्यांचे योग्य संरक्षण न केल्याने आज ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. शासनाने वेळीच त्यावर योग्य ती उपाययोजना करावी. शत्रूराष्ट्र चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालून त्याला धडा शिकवावा.
क्षणचित्रे :
१. तीन स्थानिक केबलवाहिन्यांनी आंदोलनाचे चित्रीकरण करून ते प्रसारित केले.
२. हिंदु जनजागृती समितीच्या नवीन कार्यकर्त्यांनी आंदोलनाची सेवा उत्स्फूर्तपणे केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात