जळगाव येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची शासनाकडे मागणी !
जळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या २३ किल्ल्यांवर त्वरित कारवाई करत जरी गडकोटांची मालकी खाजगी असली, तरी कायद्यानुसार राज्यसंरक्षित स्मारक घोषित करावे. राज्य संरक्षित स्मारक झाल्यावर त्यात कोणतेही पालट मालकाला करता येत नाहीत. संबंधित गड राज्य संरक्षित स्मारक करण्याविषयीचा निर्णय पूर्णतः मंत्रालयाच्या अधीन आहे. त्यामुळे या मागणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले. येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते.
शिवछत्रपतींचा वारसा असलेले मात्र राज्यातील खाजगी लोकांकडे असलेले किल्ले राज्य शासनाने कह्यात घेऊन त्यांना त्वरित संरक्षित स्मारक घोषित करावे, देशाची सहस्रो कोटी रुपयांची आर्थिक हानी टाळण्यासाठी फटाक्यांवर तात्काळ बंदी घालावी, तसेच बंगाल राज्यात ४ वर्षे श्रीदुर्गापूजेला अनुमती नाकरणार्यांवर ठोस आणि कठोर कारवाई करावी, या मागण्यांसाठी १५ ऑक्टोबरला येथे महानगरपालिकेच्या समोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलनात सहभागी विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निषेध फलक हातात घेऊन मागण्यांच्या संदर्भात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी घोषणा दिल्या अन् जनजागृतीही केली.
मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार . . .
राष्ट्र आर्थिक संकटात असतांना फटाके उडवणे देशहितविरोधी ! – योगेश पाटील, मराठखेडा धर्माभिमानी
फटाके फोडणे ही विदेशी प्रथा असून त्याला कोणताही धर्मशास्त्रीय आधार नाही. देश आर्थिक संकटात असतांना, तसेच कोट्यवधी जनतेला एक वेळचे अन्न मिळत नसतांना फटाके फोडून पैशांची उधळपट्टी करणे हे देशहिताच्या विरोधात आहे. हा पैसा राष्ट्रकार्यासाठी वापरल्यास अनेक समस्या सोडवता येतील. त्याद्वारे होणार्या ध्वनी आणि वायू प्रदूषणालाही आळा बसेल !
बंगाल राज्यातील हिंदूंना ४ वर्षे दुर्गापूजनाची अनुमती
अनुमती नाकारणार्यांवर कठोर कारवाई करा ! – दत्तात्रय वाघुळदे, सनातन संस्था
बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील कांगलापहार गावात प्रशासनाने कायदा-सुव्यवस्थेचे कारण दाखवत दुर्गापूजनास अनुमती नाकारली आहे. गावात हिंदूंची ३०० आणि मुसलमानांची केवळ २५ घरे असतांनाही बहुसंख्य हिंदूंना धार्मिक प्रथांचे पालन करणे या संविधानिक अधिकारापासून गेल्या ४ वर्षांपासून वंचित ठेवण्यात येत आहे. तरी या प्रकरणी केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करून हिंदूंना न्याय मिळवून द्यावा, तसेच दोषींवर कारवाई करावी !
आंदोलनातील मागण्यांना जळगाव जिल्ह्यातील १२ बलुतेदार समाज संघटनेचा संपूर्ण पाठिंबा ! – किशोर सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष, बारा बलुतेदार समाज संघटना, जळगाव
राष्ट्रीय हिंदू आंदोलनातील सर्व मागण्यांना जळगाव जिल्ह्यांतील बारा बलुतेदार संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे. राष्ट्र आणि धर्म विषयक सर्व आंदोलनांना संघटनेचा नेहमीच पाठिंबा राहील !
क्षणचित्रे :
१. चिनी फटाक्यांवर बहिष्कार घालावा, यासाठी प्रतिकृती सिद्ध करण्यात आली होती. ती जनसामान्यांचे आंदोलनाकडे लक्ष वेधून घेत होती.
२. रस्त्यावरील नागरिक स्वयंप्रेरणेने विषय जाणून घेऊन स्वाक्षरीद्वारे सहभाग नोंदवला.
३. अनेक नागरिक आंदोलनाची छायाचित्रे काढत होते.
४. महाविद्यालयात जाणारे दोन युवक आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात