इराकमध्ये सुन्नींच्या २ मशिदी उडवल्या ! जगभरातील शिया पंथियांकडून सौदीचा तीव्र निषेध !
तेहरान (इराण) : सुन्नीबहुल सौदी अरबमध्ये नुकतीच फाशी देण्यात आलेल्या ४७ जणांमध्ये अरब देशांच्या क्रांती आंदोलनातील शिया धर्मगुरु शेख निम्र अल् निमर हेही असल्याने शियाबहुल इराणमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. तेहरान या इराणच्या राजधानीच्या शहरात असणार्या सौदी अरबच्या दूतावासाला शिया आंदोलकांनी आग लावली. तसेच मध्य इराणमधील सुन्नी पंथियांच्या २ मशिदी स्फोटकांनी उडवल्या. या संघर्षाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिकूल परिणाम दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिया धर्मगुरूंना सौदी अरबने फासावर लटकवल्याची माहिती इराणमध्ये पसरवल्यावर शिया नागरिकांनी सौदीच्या विरोधात तीव्र आंदोलन चालू केले. तेहरानमध्ये असणार्या सौदी दूतावासाजवळ प्रचंड संख्येने हे आंदोलक जमले. ते सौदी शासनाविरोधात घोषणाबाजी करू लागले. त्यातील काही आंदोलकांनी दूतावासात घुसखोरी केली आणि दूतावास पेटवून दिला. काही कालावधीतच दूतावास आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. पोलिसांनी अधिकची कुमक मागवून अखेर आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यात आले.
इराकमध्ये सुन्नींच्या २ मशिदी स्फोटात उडवल्या !
मध्य इराणमधील सुन्नी पंथियांच्या २ मशिदी स्फोटकांच्या साहाय्याने उडवण्यात आल्या. सैन्याचा गणवेश घालून आलेल्या शिया आंदोलकांनी बगदादच्या दक्षिणेकडे असलेल्या हिला भागातील २ सुन्नी मशिदींमध्ये स्फोट घडवून आणले, तसेच मशिदीत अजान देणार्याला त्याच्या घराजवळच गोळ्या घालून ठार मारले.
जगभरातील शिया पंथियांकडून निषेध !
शिया धर्मगुरूंना फाशी दिल्याच्या सौदी शासनाच्या कृतीचा जगभरातील शिया पंथियांनी तीव्र निषेध केला आहे. सौदी अरबमधील शियाबहुल शहर अल्-काफितमध्ये शिया पंथियांनी रस्त्यावर उतरून सौदी शासनाचा निषेध केला. बहरिन आणि लेबेनॉन या देशांतही सौदीचे राजे सलमान यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ब्रिटन, भारत आणि पाक या देशांतील शिया पंथियांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
सुन्नीबहुल कुवेतनेही इराणमधील राजदूताला माघारी बोलावले !
इराणमध्ये सौदीच्या दूतावासाची जाळपोळ झाल्यानंतर सुन्नीबहुल कुवेतने त्याच्या इराणमधील राजदूताला माघारी बोलावले. सौदीच्या दूतावासाचे रक्षण करणे, हे इराण शासनाचे कर्तव्य होते. अन्य देशांच्या दूतावासाचे रक्षण करणे, हे प्रत्येक देशाचे कर्तव्य आहे, असा आतंरराष्ट्रीय नियमच आहे. इराणने त्या नियमाचे उल्लंघन केले आहे, असे कुवेत शासनाने म्हटले आहे.
सौदीने इराणसमवेतचे राजकीय संबंध तोडले !
इराणमध्ये सौदीचे दूतावास पेटवून दिल्यानंतर सौदीने इराणसमवेतचे सर्व राजकीय संबंध तोडले. त्याने त्यांचा राजदूत इराणमधून माघारी बोलावला, तसेच इराणच्या सौदीमधील दूतांना ४८ घंट्यांच्या आत देश सोडून जाण्याचा आदेश दिला.
सौदीने इराणसमवेतचे राजकीय संबंध तोडून कठोर पाऊल उचलले आहे, तथापि त्यांच्या हातून घडलेल्या मोठ्या गुन्ह्यावर (पापावर) पडदा पडू शकत नाही ! – हसन रौहानी, अध्यक्ष, इराण
मुसलमानांमध्ये प्रामुख्याने शिया आणि सुन्नी हे २ पंथ आहेत. जगातील एकूण मुसलमानांच्या लोकसंख्येपैकी शिया पंथियाची लोकसंख्या ही १० टक्क्यांच्या आसपास आहे. त्यांची एकूण लोकसंख्या सुमारे २० कोटी आहे. इराण, इराक, अझरबैजान हे देश शियाबहुल आहेत, तर अफगाणिस्तान, भारत, कुवैत, लेबेनॉन, पाक, कतार, सिरिया, तुर्कस्थान, सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरात या देशांतही शिया पंथियांचे वास्तव्य आहे.
महर्षींची इंधनांच्या तुटवड्याविषयीची भविष्यवाणी खरी ठरली !
जानेवारी मासात इंधनांचा तुटवडा भासेल (अर्थात् इंधनांच्या किमतीत वाढ होईल), अशी भविष्यवाणी महर्षींनी केली होती. सौदी-इराण यांच्यात चालू झालेल्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत सध्या २ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सौदी-इराण वादामुळे तेलाच्या किंमतीत वाढ
सौदी अरब हा कच्च्या तेलाचा सर्वांत मोठा उत्पादक देश आहे. इराणमध्ये सौदीविरोधी आंदोलन पेटल्याने सौदी अरबने इराणशी सर्व राजनैतिक संबंध तोडण्याची घोषणा केली. सौदी अरबच्या या घोषणेचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवर झाला असून त्यात २ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे सौदी-इराण संघर्षाचा परिणाम सर्व जगालाच भोगावा लागणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात