-
२३ ऑक्टोबरला होणार्या सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन
-
पुणे येथे पत्रकार परिषद
पुणे : जिहादी आतंकवादामुळे वर्ष १९९० मध्ये लक्षावधी काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधून विस्थापित व्हावे लागले. गेली २६ वर्षे ते आपल्याच देशात निर्वासितांसारखे दयनीय जीवन जगत आहेत. काश्मिरी हिंदूंनी त्यांचा सन्मान आणि राष्ट्रीयत्वाची भावना वाचवण्यासाठी धर्मांतराचा पर्याय स्वीकारला नाही. आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी मात्र काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी काही केले नाही. काश्मिरी हिंदूंचा हा नरसंहार केवळ धार्मिक कारणामुळे केला गेला.राजकीय पक्ष मात्र ते स्वीकारत नाहीत आणि काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाकडे राजकीय दृष्टीकोनातून पहातात. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन म्हणजे काश्मीरमध्ये पुन्हा राष्ट्रीयत्वाला स्थान देण्यासारखे आहे, असे प्रतिपादन युथ फॉर पनून कश्मीरचे अध्यक्ष श्री. राहुल कौल यांनी केले. २३ ऑक्टोबर या दिवशी काश्मिरी हिंदूंच्या समर्थनासाठी विराट हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या धर्मजागृती सभेची माहिती देण्यासाठी १९ ऑक्टोबर या दिवशी येथील श्रमिक पत्रकार संघात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी काश्मिरी हिंदु सभा, पुणेचे अध्यक्ष श्री. जगमोहन कौल; हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, तसेच सदस्य श्री. चैतन्य तागडे; लष्कर-ए-हिंदचे प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता श्री. देवदास शिंदे आणि हिंदु एकता आंदोलन पक्षाचे श्री. विजय पाटील उपस्थित होते.
काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये सन्मानाने पुनर्वसन व्हावे, यासाठी गेल्या वर्षभरापासून एक भारत अभियान – चलो कश्मीर की ओर हे अभियान राबवले जात आहे. त्या अंतर्गत देशभरात विविध ठिकाणी आयोजित केल्या जाणार्या धर्मसभांपैकी पुणे येथे २३ ऑक्टोबर या दिवशी होणार्या सभेस उपस्थित रहाण्याचे आवाहन श्री. कौल यांनी या वेळी केले.
काश्मिरी हिंदूंसाठी कलम ३७० लागू नसलेला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण केला जावा ! – राहुल कौल
१३ व्या शतकापासून वर्ष १९९० पर्यंत ७ वेळा काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधून पलायन करावे लागले. काश्मीरला इस्लामी राज्य बनवण्यासाठीच जिहादी आतंकवाद्यांकडून हिंदूंना हाकलून लावण्यात आले, तसेच सहस्रो हिंदूंच्या वेचून वेचून हत्या करण्यात आल्या. काश्मीरच्या खिडकीतून डोकावलेला जिहादी आतंकवाद आज पूर्ण देशभर पसरला आहे. यावर ठोस उपाय काढला नाही, तर हिंदूंना नव्यांंदा परागंदा व्हावे लागेल. त्यासाठी सर्वप्रथम काश्मिरी हिंदूंचा झालेला वंशविच्छेद धार्मिक कारणाने झाल्याचे मान्य करावे लागेल. काश्मिरी हिंदू भारताचा ध्वज हातात घेऊन बाहेर पडले होते, ते पुन्हा एक भारत अभियानाच्या माध्यमातून भारताचा ध्वज फडकवत काश्मीरमध्ये स्थायिक होतील. हा देश जोडण्याचा एक प्रयत्न आहे. धर्मसभेच्या माध्यमातून जिहादी आतंकवाद, फुटिरतावाद यांविषयी अवगत करण्यात येऊन काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंसाठी एक केंद्रशासित प्रदेश निर्माण केला जावा, ज्या ठिकाणी कलम ३७० लागू नसेल, अशी काश्मिरी हिंदूंची मुख्य मागणी आहे.
जिहाद्यांचा काश्मीरमधील प्रयोग देशभर केला जात आहे ! – जगमोहन कौल, अध्यक्ष, काश्मिरी हिंदु सभा, पुणे
काश्मीरमध्ये देश तोडू पहाणार्या फुटिरतावाद्यांना जनतेच्या पैशांमधून साहाय्य केले जाते, ही वस्तूस्थिती आहे. केवळ पाकिस्तानकडून नाही, तर भारताकडूनही त्यांना निधी दिला जात असल्याचे उघड झाले आहे. काश्मीरमध्ये बुरहान वाणी या आतंकवाद्याचा अंत केल्यानंतर देशभर चर्चा होते; मात्र काश्मीरमधून विस्थापित व्हावे लागलेल्या काश्मिरी हिंदूंविषयी मात्र चर्चा होत नाही. काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी केवळ एक प्रयोग करून पाहिला होता. तो दुर्दैवाने यशस्वी झाला आणि हा प्रयोग आता उर्वरित देशात केला जात आहे. काश्मिरी हिंदूंसाठी सर्व राष्ट्र्रप्रेमी आणि धर्मप्रेमी बांधवांनी त्यांच्या पाठीशी उभे रहावे.
काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही ! – सुनील घनवट, राज्यसंघटक, हिंदु जनजागृती समिती
काश्मिरी हिंदूंविषयी जे घडले आणि जे देशवासियांपर्यंत पोचवले यात अंतर आहे. अजूनही काश्मिरी हिंदूंच्या वाट्याला नरकयातनाच आहेत. म्हणूनच काश्मिरी हिंदूंच्या पाठीशी उभे राहण्यासाठी गोवा येथे झालेल्या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनात ठरवण्यात आले. त्याला देशभरातील १०० हून अधिक राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. काश्मिरी हिंदूंचे मनोबल वाढवण्यासाठी धर्मसभा आयोजित केली असून काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही.
धर्मसभेच्या प्रसारदरम्यान काश्मिरी हिंदूंचे सन्मानाने पुनर्वसन व्हावे, यासाठी आम्ही विविध गावांमधून काश्मिरी हिंदूंसाठी ठराव करत असून ते ठराव सरकारकडे सादर करण्यात येतील. सरकारने याकडे लक्ष दिले नाही, लष्कर-ए-हिंद पुढील कृती करेल, अशी चेतावणी अधिवक्ता श्री. देवदास शिंदे यांनी या वेळी दिली.
क्षणचित्रे :
१. या वेळी काश्मिरी हिंदूंच्या स्थितीविषयी प्रकाश टाकणारी … आणि जग शांत राहिले ही ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली.
२. पत्रकार परिषदेसाठी साध्या वेशातील पोलीस उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात