मुंबई येथे पत्रकार परिषद
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच वक्तव्य केले की, पाकिस्तान हा जगातील आतंकवादाचा अड्डा आहे. त्यासमवेत त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, भारतातील आतंकवादाचा अड्डा काश्मीर बनलेला आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून तेथील आतंकवादी तळ उद्ध्वस्त केले, त्याप्रमाणे काश्मीरमधील आतंकवादी कारवाया रोखण्यासाठी सर्जिकल हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. आतंकवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी काश्मीरला कुरुक्षेत्र बनवले पाहिजे, असे प्रतिपादन पनून कश्मीरचे अध्यक्ष डॉ. अजय च्रोंगू यांनी केले. काश्मिरी हिंदूंवरील अन्याय आणि आतंकवाद यांच्या विरोधात पनून कश्मीर आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या एक भारत अभियान या राष्ट्रीय चळवळीची माहिती देण्यासाठी २१ ऑक्टोबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी व्यासपिठावर जम्मू फॉर इंडियाचे प्रा. हरि ओम, युथ फॉर पनून कश्मीरचे राष्ट्रीय समन्वयक श्री. राहुल कौल, भारत रक्षा मंचचे श्री. अनिल धीर, तमिळनाडू शिवसेनेचे श्री. राधाकृष्णन् आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे हे उपस्थित होते. वर्ष १९९० मध्ये झालेल्या अनन्वित अत्याचारांमुळे काश्मिरी हिंदूंना स्वत:च्याच भूमीत विस्थापित व्हावे लागले. मागील २६ वर्षे काश्मिरी हिंदू विस्थापितांचे जीवन जगत आहेत. या विस्थापित हिंदूंचे काश्मीर खोर्यात पुनर्वसन व्हावे, यासाठी उभारण्यात आलेल्या एक भारत अभियानाची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
डॉ. अजय च्रोंगू पुढे म्हणाले, सर्जिकल हस्तक्षेप म्हणजे ज्या ज्या व्यक्ती आतंकवादी विचारधारेचे समर्थन करतात, त्यांच्यावर त्वरित कारवाई करणे आणि जे त्या कारवाईने बधणार नाहीत, त्यांच्या विरोधात लष्करी कारवाई करणे आवश्यक आहे. आतापर्यंतच्या शासनाने आतंकवादाविषयी संरक्षणाची भूमिका घेतली होती; मात्र केंद्रशासनाने केलेले सर्जिकल स्ट्राईक म्हणजे योग्य दिशेने उचललेले पाऊल आहे. काश्मीरमधील चुकीचा परिणाम संपूर्ण देशाला भोगावा लागत आहे. काश्मीर ही आतंकवादाची भूमी झाली आहे. शाळा, महाविद्यालये, विविध संघटना आदी माध्यमांतून या विघटनवादी शक्ती कार्यरत आहेत. राज्यशासन आणि केंद्रशासन यांच्याद्वारे या विघटनवादी शक्तींना प्रोत्साहन मिळत आहे. आतंकवादाला नष्ट करण्यासाठी प्रथम या विघटनवादी शक्तींना संपवणे आवश्यक आहे. सर्जिकल स्ट्राईक करून या विघटनवादी शक्तींना संपवले पाहिजे.
काश्मिरी हिंदूंवरील म्हणजेच देशावरील आक्रमण ! – डॉ. अजय च्रोंगू
काश्मीरमध्ये मुसलमानही रहातात, तर मग काश्मीरमधील आतंकवाद म्हणजे हिंदूंवरील आक्रमण, म्हणजे केवळ हिंदूंवरील आक्रमण कसे म्हणता येईल ? या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतांना डॉ. अजय च्रोंगू म्हणाले, काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया करण्याचा मुख्य उद्देश भारताचे इस्लामीकरण करणे, हा आहे. आतंकवाद्यांनी त्यांचा हा उद्देश कधीही लपवलेला नाही. त्यामुळे काश्मिरी हिंदूंवरील आक्रमण हे देशावरील आक्रमण आहे आणि देशावरील आक्रमण हे पर्यायाने हिंदूंवरील आक्रमण आहे.
शासनाने विस्थापित काश्मिरी हिंदूंचे सन्मानपूर्वकपुनर्वसन करावे ! – प्रा. हरिओम, जम्मू फॉर इंडिया
भारत स्वतंत्र झाला, तेव्हा काश्मीरमध्ये शंभर टक्के हिंदू होते. आता तेथे एक टक्काही हिंदू राहिलेले नाहीत. हिंदूंनी स्वखुशीने काश्मीर सोडलेले नाही. शासनाने हिंदूंचे संरक्षण केले नाही, त्यामुळेच काश्मिरी हिंदूंवर विस्थापित होण्याची वेळ आली. आता शासनाने विस्थापित काश्मिरी हिंदूंचे सन्मानपूर्वक पुनर्वसन करावे. यासाठी एक भारत अभियानाची आवश्यकता आहे.
संपूर्ण देशातील हिंदूंनी एकत्रित लढा दिल्यासच
काश्मीरचा प्रश्न सुटू शकेल ! – अनिल धीर, भारत रक्षा मंच
काश्मीर समस्येविषयी देशवासीय अवगत नाहीत. एक भारत अभियानाच्या अंतर्गत काश्मीर समस्येविषयी देशवासियांमध्ये जागृती निर्माण करण्यात येत आहे. आज केवळ काश्मीरमध्ये नाही, तर संपूर्ण भारतात आतंकवादाची समस्या भेडसावत आहे. संपूर्ण भारतात छोटे-छोटे काश्मीर निर्माण झाले आहेत. हे देशासाठी घातक आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील हिंदूंनी एकत्रित लढा दिला, तरच काश्मीरचा प्रश्न सुटू शकेल.
काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत देशभरातील ढासळलेली स्थिती रोखता येणार नाही ! – राहूल कौल, राष्ट्रीय समन्वयक, युथ फॉर पनून कश्मीर
काश्मीरमध्ये उघडपणे हिंदूंचा वंशविच्छेद झाल्याचे, तसेच हिंदु धर्मियांना निवडून त्यांचे अस्तित्व संपवल्याचे देशातील राजकीय नेते, जम्मू-काश्मीरचे राज्यशासन आणि केंद्रशासन यांनी सातत्याने नाकारले आहे. त्यामुळे काश्मीरमधील विघटनवादी धार्मिक शक्तींना बळ मिळाले आणि त्या देशभरात पसरून आता त्या संपूर्ण भारतच गिळंकृत करू पहात आहेत. काश्मीरप्रमाणेच भारतात इतरत्रही तशी स्फोटक स्थिती निर्माण झाली आहे. जोपर्यंत काश्मीरमधील हिंदूंचा वंशविच्छेद आणि स्थलांतर थांबवले जात नाही, तोपर्यंत देशभरातील ढासळलेली स्थिती आपण रोखू शकणार नाही.
काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करणे, हे शासनाचे दायित्व ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
मागील २६ वर्षे काश्मिरी हिंदु विस्थापितांचे जीवन जगत आहेत. वेगवेगळी सरकारे येऊन गेली; मात्र काश्मिरी हिंदूंचा प्रश्न सुटलेला नाही. शासनाने त्यांना सुरक्षा दिलेली नाही. त्यामुळे निर्वासित काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करणे, हे शासनाचे दायित्व आहे. याविषयी शासनाला जाणीव करून देण्यासाठी एक भारत अभिमान ही चळवळ राबवण्यात येत आहे. काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाविषयी शासनाने त्वरित निर्णय घ्यावा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments