पुणे : काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे. तेथील देशभक्त नागरिकांना हुसकावून लावण्याचे कारस्थान शत्रूराष्ट्र करत आहे. याविषयी आणि देशभरात वाढत असलेल्या आतंकवादाच्या विरोधात करण्यात येत असलेले जनजागृती अभियान म्हणून एक भारत अभियान चालू झाले आहे. त्यामध्ये काश्मिरातील मूळ निवासी असलेल्या काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाच्या हक्कासाठी पनून काश्मीर, तसेच अन्य राष्ट्रप्रेमी आणि देशभक्त संस्था यांनी एकत्र येऊन ही चळवळ उभारलेली आहे. अशा एकात्मवादाला पुणे बार असोसिएशन पाठिंबा देत आहे, असा ठराव २० ऑक्टोबर या दिवशी करण्यात आला. तसेच बार असोसिएशनच्या अधिवक्त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेचे मैदान येथे आयोजित केलेल्या विराट हिंदु धर्मजागृती सभेस जाहीर पाठिंबा दर्शवला आणि सभेस उपस्थित रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बार असोसिएशनचे सचिव अधिवक्ता श्री. सत्यजीत तुपे, अधिवक्ता श्री. प्रशांत यादव, अधिवक्ता श्री. अभिजीत डोईफोडे यांनी हा ठराव करण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला.
या वेळी श्री क्षेत्र मढी येथील कै. बाजीराव (आबा) मरकड गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय मरकड, युथ फॉर पनून कश्मीर या संघटनेचे राष्ट्रीय संयोजक श्री. राहुल कौल, लष्कर-ए-हिंदचे प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता श्री. देवदास शिंदे, आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट हे उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. अधिवक्ता श्री. सत्यजीत तुपे यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व अधिवक्त्यांनी विराट हिंदु धर्मजागृती सभेस उपस्थित राहून पाठिंबा देण्याविषयी आवाहन केले आहे.
२. पुण्यातील ज्येष्ठ अधिवक्ता श्री. दादासाहेब बेंद्रे यांचीही सर्व हिंदुत्वनिष्ठांनी भेट घेतली. त्यांना एक भारत अभियान – चलो कश्मीर की ओर या अभियानाची माहिती दिली आणि सभेस उपस्थित रहाण्याचे निमंत्रण दिले. या वेळी श्री. बेंद्रे यांनी अभियानाला आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात