‘रणरागिणी’ अंतर्गत ‘आत्मरक्षण प्रबोधन’ कार्यक्रम घेण्यासाठी उपस्थितांचा पुढाकार
पर्वरी : ‘एक भारत अभियान – काश्मीर की ओर’ या अभियानांतर्गत गोवा विकास मंच आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्तपणे पर्वरी येथील श्री. राजकुमार देसाई यांच्या निवासस्थानी नुकतेच एका सभेचे आयोजन केले होते. ‘एक वक्ता : एक सभा’ याप्रमाणे या सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेतून मिळालेल्या मार्गदर्शनातून प्रोत्साहित होऊन उपस्थितांनी अभियानांतर्गत पर्वरी परिसरात दोन ठिकाणी अशाच प्रकारे सभा घेण्याची, तसेच ‘रणरागिणी’च्या वतीने ‘आत्मरक्षण प्रबोधन आणि प्रशिक्षण’ कार्यक्रम घेण्याची तयारी दर्शवली. सभेला ‘एक भारत अभियान- काश्मीर की ओर’चे सदस्य श्री. जयेश थळी, गोवा विकास मंचचे अध्यक्ष तथा हिंदु धर्माभिमानी श्री. राजकुमार देसाई, पेन-द-फ्रान्स पंचायतीच्या सरपंच सौ. विश्रांती राजकुमार देसाई, पीपल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. नागेश गोसावी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सभेच्या प्रारंभी काश्मिरी हिंदूंना वर्ष १९९० पासून तेथील धर्मांधांच्या अनन्वित अत्याचाराला कशा प्रकारे सामोरे जावे लागले, यासंबंधी माहिती देणारी ध्वनीचित्रचकती दाखवण्यात आली. या वेळी मान्यवरांचे मार्गदर्शन झाले आणि उपस्थितांनीही उत्स्फूर्तपणे त्यांचे विचार मांडले. या वेळी बोलताना श्री. जयेश थळी यांनी सांगितले की, ‘काश्मीरमधील आतंकवादाच्या भीतीने हिंदू महिलांची मासिक पाळी ३० व्या वर्षीच बंद होते’, यावरून तेथील हिंदू महिलांवर धर्मांधाचा किती धाक आहे, हे सहज लक्षात येईल. काश्मीरमधील जखमेवर तत्कालीन शासनांनी वेळीच उपाययोजना न केल्याने ही समस्या आता पूर्ण भारतभर पसरली आहे. देशभरात कैराना, मालदा या ठिकाणी काश्मीरप्रमाणे स्थिती निर्माण झाली आहे. तेथील हिंदूंना घरदार सोडून विस्थापितांचे जीवन जगावे लागत आहे. गोव्यात किनारपट्टीवर अनेक काश्मिरी व्यवसाय करत आहेत. या पार्श्वभूमीवर काही वेळा गोव्यातील पोलीस गोव्यातील काश्मिरींना सतावत असल्याचा कांगावा श्रीनगर येथील प्रसारमाध्यमांतून केला जातो. या घटनेचा गोमंतकियांना गांभीर्याने विचार केला पाहिजे अन्यथा गोव्यातही दुसरा काश्मीर निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. एखाद्याला भाडेपट्टीवर घर देणार असल्यास सर्वतोपरी काळजी घ्यावी. श्री. जयेश थळी यांनी काश्मीरमध्ये सैनिकांची स्थिती, स्थानिक धर्मांधांचे आक्रमण, यासंबंधी सविस्तर माहिती दिली.
पीपल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. नागेश गोसावी यांनी काश्मीर भेटीच्या काळात त्यांनी अनुभवलेले प्रसंग सभेत सर्वांसमोर मांडले. ‘काश्मीरमध्ये एक हिंदू आधुनिक वैद्य रहात होते आणि त्यांना सात मुली होत्या. एकदा तेथील धर्मांधांनी त्या आधुनिक वैद्यांच्या सात मुलींना स्वत:साठी वाटून घेण्याचे ठरवले. ही भयावह आणि संतापजनक बाब आधुनिक वैद्य असलेल्या पित्याला समजल्यानंतर त्यांनी त्वरित त्या मुलींना त्यांच्या जम्मू येथील एका हिंदूंच्या घरी नेऊन सुरक्षित ठेवले आणि ते पुन्हा काश्मीरमध्ये आले. दुसर्या दिवशी त्या आधुनिक वैद्यांचा धर्मांधांनी खून केला आणि त्या ठिकाणी ‘आमच्या मुलींना पळवून नेणारा’ असा संदेश लिहून ठेवला’, हा प्रसंग ऐकल्यावर अनेकांच्या अंगावर शहारे आले. श्री. नागेश गोसावी यांनी यानंतर काश्मीरमधील हिंदू व्यावसायिकांच्या भूमी धर्मांधांनी कशा प्रकारे लुटल्या यासंबंधीही माहिती दिली. यावेळी श्री. विघ्नेश कामत यांनी गोव्यात असलेला समान नागरी कायदा देशभर लागू करण्याची आवश्यकता व्यक्त केली.