Menu Close

शिवसेना गोव्यात धर्मांतराला विरोध करणार ! – उद्धव ठाकरे

अन्य राजकीय पक्ष कधी असे बोलतात का ? यांमुळे हिंदूंना शिवसेना अधिक जवळची वाटते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

uddhav_thakre

पणजी : गोव्यात बळजोरीने आणि आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर करण्याचे प्रकार चालू आहेत. याविषयी आम्हाला माहिती आहे. बळजोरीने होणार्‍या धर्मांतराला शिवसेना विरोध केल्याशिवाय रहाणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी पणजी येथे एका पत्रकार परिषदेत एका प्रश्‍नाला उत्तर देतांना स्पष्ट केले.

श्री. उद्धव ठाकरे विविध प्रश्‍नांना उत्तर देतांना म्हणाले,

१. शिवसेना हिंदुत्वनिष्ठच आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आमचे हिंदुत्व आहे. त्यामुळे येथील राष्ट्रवादी ख्रिस्त्यांना शिवसेनेपासून घाबरण्याचे कारण नाही. म्हापसा येथील माजी नगराध्यक्ष मायकल कारास्को यांनी अनेक ख्रिस्ती कार्यकर्त्यांसह शिवसेनेत कालच प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेना ही ख्रिस्त्यांच्या विरोधात आहे, असा ग्रह कोणी करू नये.

२. शिक्षण हे मातृभाषेतूनच झाले पाहिजे. गोव्याची मराठी ही राजभाषा व्हावी, हे शिवसेनेचे मत आहे. मराठी राजभाषा व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न रहातील. त्याचबरोबर कोकणी आणि मराठी या दोन्ही बहिणी असल्याने भाषेचा विषयी भडकवण्याचे राजकारण केले जाणार नाही.

३. भाषेच्या सूत्रावरून प्रांतवार रचना झाली आहे. प्रत्येक राज्याने त्या राज्यातील व्यक्तींना रोजगार मिळेल, याची काळजी घेतली पाहिजे. यादृष्टीने गोव्यातील लोकांना रोजगारासाठी राज्याबाहेर जावे लागणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ. गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना यांच्यात तत्त्वत: युती झाली आहे. वचननामा आणि किती जागांवर निवडणूक लढवणार याचा आराखडा दिवाळीनंतर स्पष्ट होईल. गोव्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना आणि शिवसैनिक पूर्ण शक्तीनिशी लढणार आहेत.

मगोशी युती करण्याचा मार्ग मोकळा !

मगो हा समविचारी पक्ष आहे. आम्ही मगो पक्षाविषयी निर्णय घेण्याचा अधिकार हा प्रा. वेलिंगकर यांच्याकडे सोपवला आहे. त्यांनी गोव्याच्या भवितव्याविषयी योग्य तो निर्णय घ्यावा, असे श्री. उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.

गोव्यातील हिंदुत्वनिष्ठांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी विविध समस्यांवर चर्चा !

बिलिव्हर्स पंथीयांकडून होणारे हिंदूंचे धर्मांतर, बाजारपेठांमध्ये धर्मांधांची वाढती दहशत अशा गोव्याला भेडसावणार्‍या समस्यांवर शिवसेना आणि शिवसैनिक गोव्याच्या नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून लढतील, असे आश्‍वासन शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. जयेश थळी, हिंदु महासभेचे गोवा अध्यक्ष श्री. शिवप्रसाद जोशी, सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत, रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री गडेकर, व्यापारी संघटनेचे श्री. मनोज वाळके, श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानचे अध्यक्ष श्री. उर्वेश नाटेकर, धर्माभिमानी श्री. सुरेश वेर्लेकर, श्री. उदय मुंज, श्री. प्रकाश मळीक, संस्कृती रक्षक मंचचे श्री. अंकित साळगावकर आणि श्री. अनिश नाईक आदींनी गोवा भेटीवर आलेले श्री. उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना गोव्यात हिंदुत्वावर होणार्‍या आघातांविषयी माहिती दिली. या वेळी शिवसेनेचे गोवा प्रभारी खासदार श्री. संजय राऊत, महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री. दीपक केसरकर, संपर्कप्रमुख श्री. जीवन कामत, मुंबईचे नगरसेवक श्री. वासुदेव भगत, शिवसेना गोवा राज्यप्रमुख श्री. सुदीप ताम्हणकर उपस्थित होते. शिवोली भागात बिलिव्हर्स पंथीयांकडून वाढत्या धर्मांतराच्या प्रकारांविषयी श्री. उद्धव ठाकरे यांना माहिती देण्यात आली. तसेच गोव्यातील बाजारपेठांमध्ये धर्मांधांच्या वाढत्या दहशतीविषयी माहिती देण्यात आली. मातृभाषेचा विषय, तसेच अन्य विषयही मांडण्यात आले. हे सर्व विषय अवगत असल्याचे श्री. उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले आणि शिवसेना या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करील, असे आश्‍वासन दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *