हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संघटितपणाचाच हा परिणाम होय ! असे हिंदुत्वनिष्ठ सर्वत्र हवेत !
मुंबई : दिवाळीच्या दिवसांत फोडण्यात येणार्या फटाक्यांच्या वेष्टनांवर हिंदूंच्या देवतांची चित्रे (उदा. लक्ष्मीदेवी) छापण्याची १०० वर्षे जुनी असलेली अयोग्य प्रथा हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या जनजागृतीमुळे संपुष्टात आली आहे. या वर्षी आता फटाक्यांच्या वेष्टनांवर मोर, तसेच अन्य पशू-पक्षी, चित्रपट अभिनेते-अभिनेत्री अथवा फटाके निर्माते यांची नावे किंवा छायाचित्रे छापलेली आढळून आली. बाजारात देवतांची चित्रे असलेले कोणतेही फटाके आढळून येत नाहीत.
देशातील बहुतेक फटाके तमिळनाडूतील शिवकाशी येथे बनवले जातात. तेथील जिल्हाधिकार्यांनी वर्ष २०१५ मध्ये एका पत्राद्वारे फटाके निर्मात्यांच्या संघटनेला फटाक्यांच्या वेष्टनांवर हिंदूंच्या देवतांची चित्रे न छापण्याचा आदेश दिला होता. तसेच हिंदु जनजागृती समिती आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी याविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली होती. फटाक्यांच्या वेष्टनांवर हिंदूंच्या देवतांची चित्रे छापल्याने देवतांची चित्रे पायदळी तुडवली जाऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात, असा प्रचार केला होता.
फटाक्यांच्या वेष्टनांवर हिंदूंच्या देवतांची चित्रे न छापण्याच्या निर्णयाला मुसलमान दुकानदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अनेकांनी वरील निर्णयाचे स्वागत करून देवतांची चित्रे पायदळी तुडवली जाणे कोणालाही सहन होणार नाही, असे म्हटले आहे. (जे अन्य धर्मियांना समजते, ते हिंदूंना कधी समजणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात