मुंबई : नव्याची नवलाई ओसरल्यानंतर आणि मराठी मतदार पुन्हा शिवसेनेकडं वळल्यानंतर राजकीय स्थैर्याच्या शोधात असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पक्षाचा अजेंडा बदलण्याच्या तयारीत आहेत. मराठी मुद्द्याला ते हिंदुत्वाची जोड देणार असून तसे स्पष्ट संकेत खुद्द राज यांनीच आज दिले. ‘मी हिंदू आहे आणि हिंदुत्वासाठी उभा राहणार,’ अशी नवी भूमिका त्यांनी मांडली आहे.
रुईया महाविद्यालयातील जाहिरात व पत्रकारिता विभागातर्फे आयोजित ‘कलाकारण’ कार्यक्रमात राज यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी राज यांनी कलेपासून ते राजकारणापर्यंत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. ‘मनसेच्या झेंड्यातील हिरव्या रंगाबद्दल विचारले असता, ‘तो रंग भारताला मानणाऱ्या मुसलमानांसाठी आहे. अमजद अली खान यांच्या सरोदसाठी आणि झाकीर हुसेन यांच्या तबल्यासाठी तो हिरवा रंग आहे. भिवंडी आणि बेहरामपाड्यासाठी नाही,’ असं राज यांनी सांगितलं. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर ‘मी हिंदू आहे. हिंदुत्वासाठी उभा राहणार. आझाद मैदानातील त्यांच्या मोर्चाविरोधात मी रस्त्यावर उतरलो होतो,’ असेही ते म्हणाले. राज यांच्या या वक्तव्यामुळं त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेविषयी उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.
शिवसेना सोडून मनसेची स्थापना केल्यानंतर राज यांनी पक्षाचा चेहरा सर्वसमावेशक ठेवला होता. पक्ष स्थापनेच्या सभेत त्यांनी जात-पात आणि भाषेच्या पलीकडचं राजकारण करण्याची ग्वाही दिली होती. मात्र, काही दिवसांतच यू-टर्न घेत त्यांनी मराठीचा मुद्दा हाती घेतला. या मुद्द्यानं काही काळ त्यांना हातही दिला. महाराष्ट्राच्या विधानसभेत १३ आमदार निवडून आले. नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता आली. तर, मुंबई, पुण्यासह अनेक महापालिकांमध्ये मोठ्या संख्येनं नगरसेवक निवडून आले. मात्र, हे यश मनसेला टिकवता आलं नाही. ठोस काही करता न आल्यानं मराठी मतदार मनसेपासून दुरावला. त्यामुळं नव्या मुद्द्याच्या शोधात असलेल्या राज यांनी आज हिंदुत्वाकडे वळण्याचे संकेत दिले.
राज यांनी यावेळी माध्यम क्षेत्रात उतरण्याचीही घोषणा केली. मात्र, हे माध्यम नेमके कोणते असेल, याबद्दल त्यांनी स्पष्टपणे काहीही सांगितले नाही. ‘हे माध्यम कोणते असेल ते लवकरच आपणास कळेल. त्यातून माझी व्यंगचित्रंही पाहता येतील,’ असं त्यांनी सांगितलं.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स