हिंदु जनजागृती समितीची पोलीस-प्रशासनाकडे मागणी
पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सध्या बाजारात श्री लक्ष्मीदेवी, श्री विष्णू, तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक यांसारखे राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची सर्रासपणे विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देवता, तसेच राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या आणि चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालावी, अशा मागणीचे निवेदन पोलीस-प्रशासन यांना देण्यात येत आहे. फटाके फुटल्यानंतर फटाक्यावरील चित्राच्या चिंधड्या होऊन देवतांची घोर विटंबना, तसेच राष्ट्रपुरुषांचा अवमान होतो. त्यामुळे अशा फटाक्यांवर बंदी आणावी, फटाकेविक्रेत्यांवर निर्बंध आणून नागरिकांच्या धार्मिक भावना आणि राष्ट्रीय अस्मिता यांचा आदर राखावा, असे या निवेदनात म्हटले आहे.
भोरचे पोलीस उपअधीक्षक विलास यामावर, तसेच तहसीलदार वर्षा शिंगण पाटील यांना फटाक्यांवरील बंदीसंदर्भात निवेदन देण्यात आले. यामावर यांनी फटाक्यांवर देवतांची चित्रे छापणे अयोग्य असल्याचे सांगत या प्रकरणी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या वेळी प्रतापगड उत्सव समितीचे सर्वश्री विनायक काका सणस, धर्माभिमानी मनोज नाझीरकर, युवराज मगर, सतीश उगले, संतोष नाईकनवरे, देवेंद्र पांगारे, हिंदु जनजागृती समितीचे प्रा. विठ्ठल जाधव, श्री. विश्वजित चव्हाण उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात