मिरज : फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वायू आणि ध्वनी यांचे प्रदूषण होऊन समाजाचे आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात येत आहे. भारतात दिवाळीच्या काळात सहस्रो कोटी रुपयांचे फटाके फोडले जातात. देशावर ५७.२२ लक्ष कोटी रुपयांचे कर्ज असतांना, देश आर्थिक संकटात असतांना, कोट्यवधी जनतेला एक वेळचे अन्न मिळत नसतांना अशा प्रकारे प्रतीवर्षी सहस्रो कोटी रुपयांची उधळपट्टी करणे देशहिताच्या विरोधात आहे. हा पैसा राष्ट्रकार्यासाठी वापरल्यास देशातील अनेक समस्या सुटण्यास साहाय्य होईल; म्हणून शासनाने प्रदूषणकारी फटाक्यांवर पूर्णतः बंदी आणावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई यांनी केली. फटाके या विषयाच्या संदर्भात २४ ऑक्टोबर या दिवशी मिरज येथील रंगशारदा सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी सांगली जिल्हा अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन, सनातन संस्थेच्या सौ. मधुरा तोफखाने, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय रेठरेकर यांनीही पत्रकारांना संबोधित केले.
क्षणचित्र : पत्रकार परिषदेसाठी पत्रकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. स्थानिक सी केबल न्यूज आणि बालाजी केबल यांनी श्री. संतोष देसाई यांची मुलाखत घेतली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात