चुनाभट्टी (मुंबई) येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन
मुंबई : चीनची उत्पादने खरेदी करणे म्हणजे पाकिस्तानच्या आतंकवादी कारवायांना पाठिंबा देणार्या शत्रूराष्ट्राला एकप्रकारे साहाय्य करण्यासारखे आहे. हिंदु जनजागृती समिती राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून चिनी उत्पादनांच्या विरोधात आवाज उठवत आहे. हिंदु जनजागृती समिती राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून चिनी उत्पादनांना विरोध करत आहे. चिनी उत्पादनांना विरोध करणे, हे कुणा एका संघटनेचे दायित्व नाही, तर राष्ट्रावरील या संकटाला विरोध करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन चुनाभट्टी सुधार समितीचे श्री. नवीन सुर्वे यांनी केले. २३ ऑक्टोबर या दिवशी चुनाभट्टी येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. या आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. आझाद गल्ली येथील धर्माभिमानी युवक यांसह ३० राष्ट्र आणि धर्म प्रेमी या आंदोलनात सहभागी झाले होते.
या आंदोलनाद्वारे १५ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत मुंबई येथे भरवण्यात येणारे ‘चायना प्रॉडक्ट एक्झिबिशन २०१६’ हे चिनी उत्पादनांचे प्रदर्शन रहित करण्यात यावे, सहस्रो कोटी रुपयांची आर्थिक हानी करणार्या प्रदूषणकारी फटाक्यांवर तात्काळ बंदी घालावी, शिवछत्रपती यांचा वारसा असलेले किल्ले राज्य शासनाने कह्यात घेऊन त्यांना त्वरित संरक्षित स्मारक घोषित करावे, या मागण्या करण्यात आल्या.
आंदोलनानंतर झालेल्या बैठकीत आंदोलनाचे आयोजन करणार्या युवकांनी प्रत्येक मासाला देश आणि धर्म यांसाठी उपक्रम करण्याचे उत्स्फूर्तपणे ठरवले.
किल्ल्यांचे संवर्धन झाल्यासच खरा इतिहास कळेल – सुधाकर सकपाळ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले राष्ट्रकार्यासाठी स्फूर्ती देणारे आहेत. त्यांचे संवर्धन झाले पाहिजे. किल्ल्यांचे संवर्धन झाले, तरच खरा इतिहास कळेल.
सैनिकांनी सीमेवर लढावे आणि आपण शत्रूराष्ट्राची उत्पादन खरेदी करावीत, हे योग्य नाही – प्रशांत ठाकरे
फटाके आणि चिनी वस्तू यांना विरोध झाला पाहिजे. देशातील पैसा शत्रूराष्ट्रकडे जाणे म्हणजे एकप्रकारे राष्ट्रद्रोह आहे. सैनिकांनी सीमेवर लढावे आणि आपण शत्रूराष्ट्राची उत्पादन खरेदी करावीत, हे योग्य नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात