Menu Close

भारताला पाक होण्यापासून रोखण्याचे पहिले पाऊल म्हणजे पनून कश्मीर ! – डॉ. अजय च्रोंगू, पनून कश्मीर

ajay_chrungu_320
डॉ. अजय च्रोंगू, पनून कश्मीर

पुणे : काश्मीरच्या परिस्थितीला जेनोसाईड म्हणजे एखाद्या समाजाला मुळासकट नष्ट करण्याची प्रक्रिया कारणीभूत आहे. हिटलरने जर्मनीमध्ये जशी ज्यू लोकांना नष्ट करण्यासाठी ‘जेनोसाईड’ प्रक्रिया वापरली, तीच प्रक्रिया काश्मिरी हिंदूंविषयी घडत आहे. ही प्रक्रिया रोखणे आणि भारताला पाकिस्तान होण्यापासून रोखणे, याचे पहिले पाऊल म्हणजे ‘पनून कश्मीर’ (आपले काश्मीर) आहे, असे प्रतिपादन पनून कश्मीरचे अध्यक्ष डॉ. अजय च्रोंगू यांनी केले. कोथरूड व्यासपीठ आणि साहित्य वेध प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मैत्र पर्व’ चित्र, चरित्र आणि व्यंगचित्र प्रदर्शन यांविषयीचा कार्यक्रम येथील अंबर हॉल येथेे २६ ऑक्टोबर या दिवशी आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उद्घाटक म्हणून सिम्बायोसिस विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. शां.ब. मुजुमदार, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अखिल मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, कार्यक्रमाचे आयोजक शिवसेनेचे श्याम देशपांडे आणि युथ फॉर पनून कश्मीरचे राष्ट्रीय संयोजक श्री. राहुल कौल यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या ठिकाणी दिवंगत व्यंगचित्रकार आर्.के. लक्ष्मण आणि हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी साकारलेल्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन, तसेच माजी राष्ट्र्रपती आणि शास्त्रज्ञ दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या आठवणींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. शां.ब. मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका जोशी यांनी केले. या वेळी १५० हून अधिक संख्येने हिंदू उपस्थित होते.

काश्मिरी हिंदूंची भीषण अवस्था आणि त्यासाठीचे उपाय यांविषयी डॉ. च्रोंगू म्हणाले की,

१. भारताची संस्कृती म्हणजे हिमालय असून ती नष्ट करायची असेल, तर भारतभूमीला हिमालयापासून वेगळे करावे लागेल. त्यासाठी सर्वांत आधी काश्मीरला कह्यात घ्यावे लागेल, अशी पाकिस्तानची त्यामागे कूटनीती आहे.

२. इसिसच्या आतंकवाद्यांकडून जे अत्याचार केले जातात, ते चलचित्रे आणि छायाचित्रे यांच्या माध्यमातून जगभरात सर्वांपर्यंत पोचत आहेत; पण काश्मीरमध्ये गेली सहस्रो वर्षे तीच परिस्थिती असूनही आपल्या देशातील लोकांना त्या परिस्थितीविषयी माहिती नाही.

३. भगवान श्रीविष्णूने वामन अवतारामध्ये पहिल्या पावलातच सर्व पृथ्वी व्यापली. काश्मीरसारखी भयावह परिस्थिती पूर्ण भारतात उद्भवू नये, यासाठीच पनून कश्मीर हे वामनाचे पहिले पाऊल असेल. काश्मीरमध्ये स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश काश्मिरी हिंदूंसाठी मिळावा, त्यामध्ये ३७० कलम लागू नसावे आणि त्या प्रदेशामध्ये फक्त काश्मिरी हिंदूच रहावेत, अशा ३ मागण्या डॉ. च्रोंगू यांनी सर्वांपुढे मांडल्या. या मागण्यांना सर्वांनी पाठिंबा द्यावा, अशीही विनंती त्यांनी उपस्थितांना केली.

क्षणचित्रे

१. श्रीपाल सबनीस यांनी पनून कश्मीरविषयी असलेल्या व्याख्यानाच्या संदर्भात स्वतःच्या भाषणात एकही वाक्य ते बोलले नाहीत. त्यांनी जाणून बुजून उल्लेख टाळला. (कुठे देशासाठी लेखणी मोडा आणि बंदुका हातात घ्या म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे साहित्यिक आणि कुठे देशातील एका राज्यातील नागरिकांवर झालेल्या अत्याचारांविषयी एक शब्दही न बोलणारे आताचे कारकुनी साहित्यिक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. सूत्रसंचालक मोनिका जोशी यांनी सांगितले की, जगातील सर्व देशांना त्यांच्या एकाच नावाने ओळखले जाते; पण हिंदुस्थानलाच भारत, इंडिया अशी नावे देत हे हिंदूंचेच स्थान होते आणि आहे, हे जाणीवपूर्वक लपवले जाते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *