पणजी : गोव्यात नरकचतुर्दशीच्या पूर्वसंधेला नरकासुर प्रतिमांची स्पर्धा भरवण्याचे स्तोम माजले आहे. दुर्दैवाने सर्व पक्षांचे नेते अशा स्पर्धांना पाठिंबा देत आहेत. याला छेद देऊन मगो पक्षाने लोकहिताच्या दृष्टीने आणि भारतीय संस्कृतीच्या रक्षणाच्या हेतूने नरकासुराऐवजी श्रीकृष्णाचे पूजन करण्यासाठी राज्यात प्रत्येक मतदारसंघ आणि तालुक्यात उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. याविषयी पक्षाचे नेते नारायण सावंत यांनी पणजी येथे पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. श्री. नारायण सावंत म्हणाले, “रात्री उशिरापर्यंत युवक धांगडधिंगाणा घालत असतात. रात्री जागरण झाल्यामुळे युवक दीपावलीच्या दिवशी दुपारी २ पर्यंत झोपलेले असतात. त्यामुळे सकाळची दिवाळी हे युवक साजरे करू शकत नाही. नरकासुर प्रतिमा बनवण्यासाठी रात्रीच्या रात्री घराबाहेर असलेल्या युवकांवर पालकांचे नियंत्रण रहात नाही. त्यामुळे ते व्यसनाकडे वळतात, असे होऊ नये, यासाठी मगो पक्षाने प्रत्येक मतदारसंघात आणि तालुक्यात एकत्र जमण्याचे आणि या ठिकाणी भजन करायचे, गीता वाचन आदी सात्त्विक कार्यक्रम करायचे ठरवले आहे”. नरकासुर स्पर्धेला असलेला सनातनचा विरोध आणि मगो पक्षाचा हा उपक्रम कदाचित योगायोग असू शकतो; मात्र ही मगो पक्षाची स्वतंत्र भूमिका आहे, असे श्री. नारायण सावंत यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना स्पष्ट केले.
युवा पिढीला धर्माचे, संस्कृतीचे ज्ञान व्हावे, यासाठी उपक्रम ! – श्री. सुदिन ढवळीकर
काही दिवसांपूर्वी मगो नेते श्री. सुदिन ढवळीकर यांनी बांदोडा येथील मगो पक्षाच्या कार्यालयात याविषयी माहिती दिली होती. त्या वेळी श्री. सुदिन ढवळीकर म्हणाले, “आजची युवा पिढी पाश्चात्त्य संस्कृतीकडे वळत आहे. त्यांना आपल्या धर्माचे, गोमंतकीय लोककलेचे आणि संस्कृतीचे ज्ञान व्हावे, याच उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. पुराण काळात नरकासुराने केलेले अत्याचार आणि जाच याला जनता कंटाळली होती. त्यांना मुक्तता देण्यासाठी श्रीकृष्णाने त्यांचा वध केला होता; मात्र कालौघात श्रीकृष्णाला महत्त्व न देता नरकासुरालाच अवास्तव महत्त्व दिले जाऊ लागले आहेत. हे चित्र पालटून श्रीकृष्णाचे महत्त्व युवा पिढीला पटवून देण्याचा हा प्रयत्न आहे”.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात