फोंडा (गोवा) येथे निदर्शनाद्वारे हिंदु संघटनांची मागणी
फोंडा (गोवा) : प्रदूषणकारी आणि हिंदूंच्या देवता अन् राष्ट्रपुरुष यांची विटंबना करणार्या फटाक्यांची निर्मिती आणि विक्री थांबवावी, तसेच अवैधपणे विक्री होत असलेल्या चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालावी. नागरिकांनी या फटाक्यांचा वापरही टाळावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी २६ ऑक्टोबर या दिवशी फोंडा शहरात निदर्शनाद्वारे केले.
या निदर्शनाला दादा वैद्य चौक येथून प्रारंभ झाला. चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला, स्वदेशीचा वापर करा, अशा विविध घोषणा या वेळी देण्यात आल्या. तसेच ५७ लक्ष कोटी रुपयांचे विदेशी कर्ज असतांना फटाक्यांवर प्रतिवर्षी ३ सहस्र कोटी रुपये खर्च करणे हा देशद्रोह या आशयाचे फलकही या वेळी हातात धरण्यात आले होते. प्रारंभी आंदोलनाचा उद्देश सांगताना हिंदु जनजागृती समितीचे श्री. सत्यविजय नाईक यांनी म्हटले की, देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. हे फटाके फोडल्यावर त्यांवरील देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांच्या चिंधड्या उडतात अन् त्या जागोजागी पडलेल्या आढळतात. चिंधड्या उडालेले हे तुकडे अनेकांच्या पायाखाली, केरात, चिखलात, नाल्यांत पडलेले निदर्शनास येतात. त्यामुळे देवतांची विटंबना आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान होऊन कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक अन् राष्ट्रीय भावना दुखावल्या जात आहेत. सध्या चिनी फटाकेही बाजारात उपलब्ध आहेत. या फटाक्यांमध्ये विषारी घटकांचे प्रमाण अधिक असते आणि यामुळे ते स्वस्त असले, तरी अत्यंत प्रदूषणकारी आहेत. प्रदूषणकारी चिनी फटाक्यांवर बंदी आहे. अवैधपणे चिनी फटाके विक्री करणार्यांवर योग्य ती कारवाई व्हावी.
शहरात प्रारंभी दादा वैद्य पुतळ्याजवळ, नंतर कॅनरा बँकेसमोर, भवानी सदनासमोर आणि शेवटी वरचा बाजार प्रवेशद्वाराजवळ ही निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला. निदर्शनांना श्री गणपतीचा श्लोक म्हणून प्रारंभ करण्यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. जयेश थळी, धर्माभिमानी श्री. संतोष कापडी, श्री. प्रताप नाईक, श्री. अनंत बोंद्रे, श्री. अशोक प्रभु हे आंदोलनात सहभागी झाले होते. श्री. रमेश नाईक आणि फोंडा येथील हिंदु धर्माभिमानी श्री. मधुसूदन देसाई या हिंदुत्वनिष्ठांनी या वेळी विचार मांडले.
क्षणचित्रे
१. फोंडा येथील किरणामालाचे मोठे व्यापारी रा.व्यं. कुडतरकर अॅण्ड सन्स यांना या वेळी निवेदन देण्यात आले. त्यांनी लगेचच हे निवेदन मागील भिंतीवर चिकटवले. येणार्या सर्व ग्राहकांना मी हे निवेदन वाचण्यास सांगेन. तुमचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे, असे कुडतरकर म्हणाले.
२. एक २० जणांचा गट स्वत:हून आंदोलनात सहभागी झाला.
३. गुप्तचर विभागाचे पोलीस येऊन चौकशी करून गेले. (सार्वजनिकरित्या चालू असलेल्या निदर्शनांची कसली चौकशी पोलीस करतात ? अशी चौकशी अन्य धर्मियांच्या निदर्शनांच्या वेळी केली जाते का ? – संपादक)
फोंडा येथे निदर्शनांच्या वेळी विक्रेते आणि नागरिक यांनी व्यक्त केलेले अभिप्राय
चौधरी इलेक्ट्रीकल, फोंडा : आमच्या दुकानातील बहुतेक सामान हे देशी आस्थापनांनी बनवलेले आहे. पुढच्या दिवाळीच्या वेळी आम्ही एकही चिनी वस्तू ठेवणार नाही.
श्री. भाऊसाहेब देसाई, शिक्षक, फोंडा : मोदी सरकारने स्वत:चे ज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा उपयोग करून मेक इन इंडियाचा विचार सर्वांसमोर ठेवला आहे. त्यामुळे आपण आता सरकारच्या सोबत समर्थपणे उभे राहिले पाहिजे. अतिशय योग्य असा तुमचा उपक्रम आहे.
श्री. राजेंद्र तळावलीकर, फोंडा तालुकाप्रमुख, शिवसेना : चिनी वस्तू खरेदी करून आम्ही सैनिकांच्या हत्येचे समर्थन करत आहोत. नागरिकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घातला पाहिजे, तरच आपले राष्ट्रप्रेम जागृत होईल.
नटराज टीम, इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेेते : चिनी बनावटीचे भ्रमणध्वनी आम्ही विकणार नाही.
श्री. सूरज कुडतरकर, फटाके विक्रेता : देवतांची चित्रे असलेले फटाके आणि चिनी बनावटीचे फटाके आम्ही कधीच विकणार नाही.
श्री. अजय राजपुरोहित, ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट दुकान : चीनचे सुटे भाग आम्ही यापुढे कधीच विकणार नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात