निजामाबाद : येथील हिंदुत्वनिष्ठांनी फटाक्यांमुळे होणार्या दुष्परिणामांच्या संदर्भात येथे जनजागृती करण्यासाठी अभियान राबवले. या अंतर्गत प्रशासनाला निवेदने देण्यात आली.
१. हिंदु जनजागृती समितीशी जोडले गेलेले धर्माभिमानी श्री. श्रीनिवास यांनी येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांना एकत्रित करून फटाक्यांमुळे होणारी हानी, चिनी फटाक्यांवर बहिष्कार घालणे या संदर्भात जनजागृतीसाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. यात बजरंग दल, हिंदु वाहिनी, हिंदु युथ, हिंदु राष्ट्र उत्सव समिती, हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी जनजागृतीसाठी १० सहस्र हस्तपत्रकांचे वितरण करणे, प्रत्येक संघटनेकडून ५ फ्लेक्स फलक लावणे आणि स्थानिक दूरचित्रवाहिन्यांवरून प्रचार करण्याचे ठरवण्यात आले. बैठकीसाठी श्री. यादगिरी आणि अधिवक्ता शरत चंद्र यांनी साहाय्य केले.
२. या संदर्भात वरील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या शिष्टमंडळाकडून निजामाबादचे सहजिल्हाधिकारी वेंकटेश्वर राव यांना निवेदन देण्यात आले. यानंतर राव यांनी पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांना देवतांची चित्रे असणार्या फटाक्यांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या.
३. शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांनाही निवेदन दिल्यावर त्यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकार्यांना हिंदूंच्या देवतांची चित्रे असणार्या फटाक्यांची विक्री करणार्या दुकानांमध्ये पडताळणी करण्याचा आदेश दिला. नव तेलंगण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारीही सहभागी झाले होते.
४. अर्मुरचे पालिका अध्यक्ष, बोधन येथील महसूल विकास अधिकारी, करीमनगर येथील जिल्हा महसूल अधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेना, रा.स्व. संघाचेही कार्यकर्ते सहभागी झाले होते.
५. अधिवक्ता शरत चंद्र यांनी निजामाबाद येथील पोलीस ठाण्यात देवतांची चित्रे असणार्या फटाक्यांवर कारवाई करण्यासाठी तक्रार प्रविष्ट केली. या वेळी पोलिसांनी कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
६. K६ या दूरचित्रवाहिनीवरून फटाक्यांच्या संदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हिंदु जनजागृती समितीचे श्री. चेतन जनार्दन यांनी सहभाग घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात