मांगूर (तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव) येथील हिंदु धर्मजागृती सभेला २ सहस्र ५०० जिज्ञासूंचा प्रतिसाद !
मांगूर : ‘देशात सर्वधर्मसमभाव आहे. आपण हिंदू या हिंदुस्थानात सर्वांना प्रेमाने वागवत आलो. तरीही हिंदु महिलांवर अत्याचार होत आहेत. भ्रष्टाचार वाढतच आहे. याला कारणीभूत देशद्रोही संघटना आणि राजकारण आहे. हिंदु धर्म आणि महिला यांवर होणारे अत्याचार, देशातील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येऊन देशद्रोहीरूपी कर्करोगावर वेळीच उपाय करणे आवश्यक आहे’, असे आवाहन श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. २४ ऑक्टोबर या दिवशी ते येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर समोरील पटांगणात आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत आणि श्रीराम सेना शाखेच्या उद्घाटनच्या प्रसंगी बोलत होते. या वेळी व्यासपिठावर श्रीराम सेनेचे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे आणि अधिवक्ता रणजित घाटगे, श्रीराम सेनेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथील श्री शिवचरित्र अभ्यासक नीळकंठ माने उपस्थित होते.
श्रीराम सेना मांगूर शाखेच्या फलकाचे अनावरण छत्रपती शिवाजी महाराज, श्रीराम-सीता आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत आणि प्रास्ताविक श्री. विशाल सुतार यांनी केले. कु. शुभांगी ढेकणे हिने इयत्ता दहावीत शाळेत प्रथम क्रमांक मिळवल्याविषयी सत्कार करण्यात आला. सभेला बेळगाव जिल्ह्यातील मांगूर, बागवाड, कुन्नर, एकसंबा, निपाणी, कारदगा आदी परिसरातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले…
१. आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे का ? भ्रष्टाचारामुळे देश नष्ट होत आहे. त्यातून देशाला वाचवायचे असेल, तर सर्व हिंदूंनी संघटित होऊन श्रीराम सेनेच्या शाखा गावागावात चालू कराव्यात.
२. देश वाचवणे, हे श्रीराम सेनेचे ध्येय आहे. संगोळी रायण्णा, कितूर राणीचनम्मा, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्यांनी देशासाठी बलिदान दिले; मात्र त्यांचा इतिहास तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी पुढे ठेवला नाही.
३. स्वातंत्र्यानंतर जिंदालने हिंदू-मुसलमान एकत्र राहू शकत नसल्याचे सांगितले. त्याला तेव्हाच्या काँग्रेस नेत्यांनी विरोध केला नाही; म्हणूनच आज देशात देशद्रोहीरूपी कर्करोग पसरत आहे.
४. या देशात हिंदु-मुसलमान भाई भाई म्हटले जाते; मात्र याच देशात हिंदूंना एक आणि मुसलमानांना एक असे दोन कायदे का ? हे मोडून काढून हिंदु समाजाला सुखी समाधानाने जगता यावे, यासाठी श्रीराम सेना झटत आहे.
५. पाकिस्तान भारतात घुसखोरी करत आहे. त्यालाही राज्यकर्तेच कारणीभूत आहेत. हिंदूंवरील अत्याचार आणि गोमातेची हत्या रोखण्यासाठीच आमचा लढा चालू आहे.
क्षणचित्रे
१. पोलिसांनी हिंदु धर्मजागृती सभेला त्याच दिवशी अनुमती दिली. धर्माभिमान्यांनी सभेपूर्वी मागणी करूनही पोलिसांनी सभेला लगेच अनुमती दिली नाही. (अन्य धर्मियांच्या संदर्भात पोलिसांनी इतका विलंब केला असता का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पोलिसांनी संपूर्ण सभेचे ध्वनीचित्रीकरण केले.
२. निपाणी येथील श्रीराम सेनेचे प्रमुख श्री. सागर श्रीखंडे यांनी मांगूर शाखा चालू करण्यासाठी परिश्रम घेतल्याविषयी त्यांचा सत्कार करण्यात आला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात