चेन्नई : हिंदु राष्ट्र स्थापनेचे लक्ष्य समोर ठेवून त्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याच्या उद्देशाने तमिळनाडूतील २७ हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी चेन्नई येथे नुकतीच एक बैठक घेतली. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.
हिंदु जनजागृती समितीच्या सौ. उमा रविचंद्रन् यांनी प्रारंभी दीपप्रज्वलन केले. त्यानंतर जिहाद्यांकडून हत्या करण्यात आलेल्या हिंदु नेत्यांना श्रद्धांजली वहाण्यात आली. या वेळी सौ. उमा रविचंद्रन् यांनी सनातन धर्मराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापण्यामागची आवश्यकता विशद केली. हे दैवी कार्य असून त्यासाठी आपण पात्र होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्यातील राग, मत्सर यांसारखे दोष आणि अहं नष्ट करणे आवश्यक आहे, असे सौ. रविचंद्रन् यांनी सांगितले.
अखिल भारतीय हिंदु महासभेचे श्री. बालसुब्रह्मण्यम् म्हणाले की, ख्रिस्त्यांकडून होणारे धर्मांतराचे प्रकार म्हणजे हिंदूंवर होणारा विषप्रयोगच (स्लो पॉयजनिंग) आहे. तसेच इस्लाममध्ये होणार्या धर्मांतराचा धोका ओळखून आपण त्याविषयी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.
तमिळनाडूचे जलदगतीने इस्लामीकरण चालू आहे. कोईम्बतूर येथे मुख्य इस्लामी संघटनेचा उदय झाला आणि तिला द्रविडी राजकीय पक्षांनी खतपाणी घातले, असा आरोप हिंदु मक्कल कत्छीचे श्री. अर्जुन संपथ यांनी केला. अखिल भारतीय हिंदु महासभेचे श्री. श्रीधरन् यांनी जिहादपीडित हिंदु कुटुंबांना साहाय्य करण्याचे आवाहन केले.
दुपारच्या सत्रात सनातन संस्थेच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी धर्मसेवा करतांना साधना करण्याचे महत्त्व विशद केले. या वेळी गोरक्षा दल, अखिल भारत सत्य सेना, शिवसेना, हिंदु एलयंगार एळूची पेरवई, हिंदु द्रविड कळघम, हिंदु एळूची मुन्नानी, तमिळनाडू नवनिर्माण सेना, भारत सेना, हिंदु साहित्य सेना इत्यादी संघटनांच्या नेत्यांनी या वेळी विचार मांडले.
बैठकीच्या समारोपाच्या सत्रात हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने सामायिक कार्यक्रम पुढे नेण्यासाठी सर्व हिंदु संघटनांनी तमिळ हिंदु परिवार नावाचा संघ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
क्षणचित्रे
१. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारत हिंदु मुन्नानीचे श्री. प्रभु, अखिल भारत सत्य सेनेचे श्री. वसंत कुमार आणि अखिल भारतीय हिंदु महासभेचे श्री. डनलप कुमार यांनी पुढाकार घेतला.
२. गोव्यातील अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाला उपस्थित राहिलेल्या श्री. आर्.डी. प्रभु यांनी त्याच धर्तीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा प्रयत्न केला.
३. कार्यक्रमाच्या प्रारंभापासून समारोपापर्यंत पोलीस आणि गुप्तचर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्याऐवजी तमिळनाडूतील जिहाद्यांवर लक्ष ठेवल्यास हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या तरी रोखल्या जातील ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात