चेन्नई : माजी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी ख्रिस्तोदास गांधी यांनी १८ ऑक्टोबर या दिवशी तंदी वृत्तवाहिनीवर आयोजित एका परिसंवादात भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. श्रीरामाच्या प्रतिमेला चपलेने मारले, तरी मला कुणी अडवू शकणार नाही, असे अश्लाघ्य आणि विडंबनात्मक वक्तव्य केले होते. त्यामुळे हिंदु समाजात संतापाची लाट उसळली. त्याचा निषेध करून ख्रिस्तोदास गांधी यांना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी चेन्नई येथील वल्लूवर कोट्टम या ठिकाणी अखिल भारतीय हिंदु महासभेने २८ ऑक्टोबर या दिवशी एक दिवसाचे उपोषण केले.
या उपोषणाचा प्रारंभ मातम्मल आश्रमाचे श्रीलक्षी ज्योतीवेल स्वामी यांच्या आशीर्वादाने झाला. या उपोषणात सहभागी झालेल्या धर्माभिमान्यांनी श्रीरामाचा जप केला आणि भजने म्हटली. या उपोषणात भाग घेणार्या मान्यवरांमध्ये हिंदु मक्कल कत्छीचे श्री. रामा रविकुमार, भारत हिंदु मुन्नानीचे श्री. आर्.डी. प्रभू, तमिळनाडूतील शिवसेनेचे प्रमुख श्री. राधाकृष्णन् आणि धर्म सेवालय विश्वस्त संस्थेचे श्री. एथीराज यांचा समावेश होता.
हिंदु जनजागृती समितीच्या सौ. उमा रविचंद्रन् यांनी उपोषणकर्त्यांना संबोधित करतांना म्हटले, ज्या देशात हिंदू बहुसंख्येने रहातात, तेथे हिंदूंच्या देवतेचे विडंबन होते ही आश्चर्याचीच गोष्ट आहे. अशा घटना रोखण्यासाठी भारतात सनातन धर्म राज्य स्थापन होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होऊन त्यांच्या सर्व आंदोलनात्मक कृती धर्माप्रमाणे करणे आवश्यक आहे. जेथे ईश्वराचे अधिष्ठान असते, तेथे यश नक्की मिळते, तसेच यामुळे आपली आध्यत्मिक उन्नतीही होते. सौ. उमा रविचंद्रन् यांनी आंदोलन करणार्या अखिल भारतीय हिंदु महासभेचे अभिनंदन केले. सौ. रविचंद्रन् यांनी श्रीलक्षी ज्योतीवेल स्वामी यांना वर्ष २०१७ चे सनातन पंचाग भेट दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात