अमूल्य आणि ऐतिहासिक ठेव्याकडे सरकार लक्ष देणार कि त्यासाठी इतिहासप्रेमींनाच चळवळ उभारावी लागणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : राज्याच्या ग्रामीण भागातून देवतांच्या अनेक प्राचीन मूर्ती, वीरांची स्मृतीचिन्हे आणि विरगळ यांची सध्या चोरी होत आहे. हा वारसा दुर्लक्षित राहिल्याने त्यांची अवैध विक्री करून पैसे कमावले जातात. आंतरराष्ट्रीय काळ्या बाजाराशी संबंधित तस्करांच्या टोळ्या यामागे कार्यरत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. (पोलीस या टोळ्यांची पाळेमुळे शोधून ती उद्ध्वस्त का करत नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या संदर्भात वारसा अभ्यासक सौ. सायली पलांडे-दातार यांनी सांगितले, मंदिराबाहेर अथवा नागरिकांच्या अंगणात असलेल्या मूर्तींची नोंद सरकारकडे नाही. प्रश्नोत्तरांचा मनःस्ताप नको; म्हणून मूर्ती चोरीला गेल्यावर गावकरी पोलिसांकडे तक्रार नोंदवत नाहीत. शहरात तुमच्या दारातील मूर्ती आम्हाला विकत देता का ?, अशी थेट मागणीही केली जाते. नागरिकांनी वंशपरंपरेनुसार आलेल्या ऐतिहासिक वस्तूंची सरकारकडे नोंदणी करणे बंधनकारक असूनही त्याविषयी लोक उदासीन आहेत.
मूर्ती नाहीशा होत असूनही पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष !
इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत म्हणाले, आतापर्यंत कोणत्याही पहार्याविना माळरानावर सुरक्षित असलेल्या शेकडो रेखीव आणि सुबक मूर्ती आता अचानक नाहीशी होत आहेत. अनेक किल्ले आणि मंदिरे यांच्या जवळच्या परिसरात असलेल्या मूर्ती अल्प होत आहेत. अनेक दुर्गप्रेमींनी पुरातत्व विभागाकडे त्याविषयीची तक्रार करूनही हा भाग आपल्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगून त्याकडे दुर्लक्ष केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात