पंढरपूर : कार्तिकी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागांतून वारकरी पायी दिंड्या-पताकांसह पंढरपुरात दाखल होऊ लागले आहेत. आज सायंकाळी पंढरीत सुमारे एक लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. दरम्यान, चंद्रभागा नदीपात्र अद्यापही कोरडेच असल्याने भाविकांची कुंचबणा होत असून, पंढरपूर येथील बंधाऱ्यातून चंद्रभागेत पाणी सोडावे, अशी मागणी वारकऱ्यांमधून केली जात आहे.
शहरातील मठ व धर्मशाळा वारकऱ्यांच्या गर्दीने भरले आहेत. यात्रेच्या निमित्ताने वाळवंटामध्ये राहुट्या टाकण्यासाठी वारकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. सध्या पात्रात पाणी नसल्यामुळे यात्रेसाठी आलेल्या भाविकांची स्नानाची गैरसोय होत आहे. शिवाय पात्रात अजूनही वाळूचे खड्डे आहेत. या खड्यांमुळे भाविकांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. सर्वत्र विठुनामाचा गजर सुरू झाल्याने पंढरीचे वातावरण भक्तिमय झाले आहे.
संदर्भ : सकाळ