बांगलादेशातील हिंदूंना साहाय्य करण्याचे आश्वासन देणारे केंद्र सरकार कुठे आहे ? – दैनिक सनातन प्रभात
ढाका : बांगलादेशमधील गोविंदपूर जिल्ह्यात असलेल्या रंगपूर साखर कारखान्याच्या परिसरातील हक्काच्या भूमीतून जाण्यास नकार देणार्या मूळ हिंदु संथाल आदिवासींवर पोलीस, शीघ्र कृती दल आणि स्थानिक गुंड यांनी आक्रमण केले. या आक्रमणात २ हिंदु संथाल आदिवासी ठार झाले असून ८ पोलिसांसह ३० जण घायाळ झाले, तर १ सहस्र २०० हिंदु आदिवासी कुटुंबे घरे सोडून पळून गेली.
१. १९७१ पूर्वीच्या पूर्व पाकिस्तानात रंगपूर येथे साखर कारखाना काढण्याचा निर्णय झाला. त्यासाठी आवश्यक अशी १ सहस्र ८४२ एकर भूमी स्थानिक हिंदु संथाल आदिवासींकडून अधिग्रहित केली गेली आणि त्यावर रहात असलेल्या आदिवासींना विस्थापित करण्यात आले. अधिग्रहण कराराप्रमाणे जर या भूमीवर ऊसाव्यतिरिक्त अन्य पिके घेण्यात आली, तर ती भूमी मूळ आदिवासींना परत करण्याचे प्रावधान आहे.
२. हा साखर कारखाना ३१ मार्च २००४ या दिवशी भ्रष्टाचार, गैरव्यवस्थापन इत्यादी कारणांनी बंद पडला. तेव्हा सरकारने ती भूमी स्थानिक खासदार आणि काही वजनदार राजकीय पुढारी यांना दिली. त्यावर तांदूळ, गहू, तंबाखू, बटाटे इत्यादी पिके घेण्यास या पुढार्यांनी प्रारंभ केला. याला मूळ आदिवासी मालकांनी आक्षेप घेऊन ते या भूमीवर येऊन वस्ती करून राहू लागले. त्यांना तेथून हाकलून देण्यासाठी राजकीय पुढार्यांनी कट करून पोलीस, शीघ्र कृती दल आणि स्थानिक गुंड यांच्या साहाय्याने ६ आणि ७ नोव्हेंबर या दिवशी आक्रमण केले. आदिवासींनी त्याला विरोध केला असता पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यात २ संथाल आदिवासी ठार झाले असून ८ पोलिसांसह ३० जण घायाळ झाले.
३. स्थानिक गुंडांनी आदिवासींच्या घरांवर आक्रमण करून तेथील अन्नधान्य, गुरे, घराचे सामान आणि इतर किरकोळ वस्तू लुटून नेल्या आणि आदिवासींना मारहाण केली. त्यामुळे १ सहस्र २०० आदिवासी कुटुंबे घरे सोडून पळून गेली.
४. अजून ५ जण बेपत्ता असून त्यांची हत्या झाली असावी. सध्या घटनास्थळी जाण्यास आदिवासींना मज्जाव करण्यात येत आहे
५. पोलिसांनी या प्रकरणी ३१ आदिवासी आणि ४०० ते ५०० अज्ञात व्यक्तींच्या विरोधात ४ गुन्हे प्रविष्ट करून त्यातील काहींना अटक केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात