नवी मुंबई – करावे गावातील प्रसिद्ध गणेश मंदिरात शुक्रवारी पहाटे चोरीची घटना घडली आहे. केवळ तीन मिनिटांमध्ये मंदिरातील मौल्यवान वस्तू आणि दानपेटीवर हात साफ करुन चोरटे पसार झाले आहेत. मंदिराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी जवळपास ११ किलो चांदीसह दोन मूर्ती आणि दानपेटीतील सुट्टे पैसे वळगता सर्व रक्कम चोरी केली आहे. चोरीची ही दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत.
गावदेवी तलावाजवळ १९८२ साली गणेश मंदिर बांधण्यात आले. फेब्रुवारी महिन्यातच मंदिराचा जिर्णोद्धार करुन ग्रामस्थांनी मंदिराच्या गाभा-यावर ११ किलो वजनाच्या चांदीची कमान बसवली. शिवाय, मुख्य गणेश मूर्तीच्या शेजारी रिद्धी आणि सिद्धीची चांदीच्याच मूर्तींची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली होती.
त्यानंतर शुक्रवारी पहाटे २ वाजून ३१ मिनिटांनी ही चोरीची घटना घडली आहे. यातील एक चोराने कटावणीच्या सहाय्याने चांदीची कमान काढली,तर दुस-याने दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील चिल्लर वगळता सर्व नोटा पिशवीमध्ये भरल्या. केवळ तीन मिनिटांमध्ये या चोरट्यांनी मंदिरात हात साफ केला आहे. याप्रकरणी एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
स्त्रोत : लोकमत