-
देवतांचे विडंबन टाळण्यासंबंधी हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम !
-
उपक्रमाला व्यापार्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
पणजी : हिंदु जनजागृती समितीने हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले गोणपाट वापरणे थांबवून देवतांची होणारी विटंबना टाळण्यासंबंधी नुकतेच गोव्याची राजधानी असलेल्या पणजी येथील व्यापार्यांचे प्रबोधन केले. पणजी येथील व्यापार्यांनी हा उपक्रम चांगला असल्याचे सांगून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दर्शवला.
या उपक्रमांतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या एका शिष्टमंडळाने पणजी येथील व्यापारी अजय अमित ट्रेडर्स, दामोदर लक्ष्मीदास, काशीनाथ भोबे, भगत एन्टरप्राईझेस आणि पै ट्रेडर्स या व्यापार्यांची भेट घेऊन त्यांचे या विषयावर प्रबोधन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्येे श्री. शैलेश नाईक, हिंदु धर्माभिमानी श्री. कालीदास रायकर, श्री. राज चोपडेकर आणि श्री. त्रिवेंद्र नाईक यांचा समावेश होता.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एक निवेदन या वेळी व्यापार्यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले गोणपाट हल्ली बाजारात बर्याच ठिकाणी आढळून येत आहेत. देवतांची किंवा राष्ट्रपुरुषांची चित्रे असलेले गोणपाट वापरल्याने अजाणतेपणाने धर्म अथवा राष्ट्र यांची हानी होत असते. देवतांची किंवा राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले गोणपाट अस्वच्छ जागेत किंवा मांसाहार होत असलेल्या ठिकाणी ठेवले जात असल्याने किंवा हे गोणपाट पायाखालीही तुडवले जात असल्याने देवतांचे विडंबन होतेे. हे अत्यंत चुकीचे आहे. यास्तव देवतांची अथवा राष्ट्रपुरुषांची चित्रे असलेले गोणपाट वापरणे थांबवावे. देवतांची किंवा राष्ट्रपुरुषांची चित्रे असलेले गोणपाट पाठवणार्या घाऊक विक्रेत्यांचे याविषयी प्रबोधन करून त्यांना देवतांची चित्रे प्रसिद्ध न करता गोणपाट पाठवण्यास सांगावे. व्यापार्यांनी या वेळी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी श्री तिरुपति बालाजी या देवतेचे छायाचित्र असलेले गोणपाट बालाजी ब्रँडच्या नावाने येत असे; पण पुढे असे गोणपाट येणे बंद झाले. आता बाळकृष्णाचे चित्र असलेले कृष्णा ब्रँडचे गोणपाट बाजारात येत आहेत. कृष्णा ब्रँडच्या व्यवस्थापनाचे याविषयी प्रबोधन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने पुढाकार घेण्याची मागणी काही व्यापार्यांनी केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात