हिंदूसंघटन मेळाव्याच्या निमित्ताने गोव्यातील केपे तालुक्यातील काजूर गावातील हिंदूंची बैठक !
काणकोण : हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे कार्य मी सतत वृत्तपत्रातून वाचतो. समितीच्या कार्यकर्त्यांनी केपे तालुक्यातील दुर्गम भागत असलेल्या आमच्या काजूर गावात हिंदूसंघटन मेळाव्यानिमित्त बैठक घेऊन केलेले मार्गदर्शन प्रेरणादायी आणि समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताचे आहेे. असे कार्य ही काळाची आवश्यकता आहे. समितीच्या या कार्याला आम्ही आवश्यक ते सर्व सहकार्य करणार, असे प्रतिपादन गोव्यातील काजूर गावचे पंचसदस्य आणि कावरे-पिर्ला ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. तोळयो गावकर यांनी स्थानिक हिंदूंच्या बैठकीत बोलतांना केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २० नोव्हेंबर या दिवशी आयोजित हिंदूसंघटन मेळाव्याच्या आयोजनाच्या निमित्ताने अलीकडेच ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत हिंदु जनजागृती समितीच्या सौ. ज्योती पैंगीणकर यांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्यस्थितीचा विषय मांडला.
श्री. गावकर पुढे म्हणाले, सौ. ज्योती पैंगीणकर यांनी मांडलेला विषय ऐकून समाजाला धर्मशिक्षणाची आवश्यकता का आहे, याची जाणीव झाली. धर्म, संस्कृती यांच्या रक्षणासाठी आणि देवतांची विटंबना रोखण्यासाठी प्रत्येकाने जागरूक रहायला हवे, याची जाणीव झाली. हिंदूसंघटनाचे हे स्तुत्य कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे. सौ. पैंगीणकर यांनी हिंदूंवर सध्या होत असलेले आघात स्पष्ट केले. काश्मीरमधील हिंदूंवर होत असलेली आक्रमणे,२६ वर्षांपासून निर्वासितांचे जीवन जगणार्या लक्षावधी कश्मिरी हिंदूंची स्थिती सौ. पैंगीणकर यांनी उपस्थितांना सांगितली. गोव्यात बिलिव्हर्स पंथीयांकडून चालू असलेल्या धर्मांतराच्या कारवायांविषयी त्यांनी उपस्थितांना माहिती दिली आणि या सर्वांवर हिंदूंमध्ये धर्मशिक्षणाद्वारे धर्माभिमान वाढवून धर्माभिमानी हिंदूंचे संघटन निर्माण करणे हाच उपाय आहे, असे सांगितले. या बैठकीनंतर ऋणनिर्देश करतांना सरपंच श्री. तोळयो गावकर म्हणाले, धर्मशास्त्र समजून घेऊन आपले सण आणि उत्सव साजरे केल्यास कसा लाभ होतो, याची माहिती आम्हाला दिल्याविषयी आम्ही समितीचे कार्यकर्ते सौ. ज्योती पैंगीणकर आणि श्री. गोविंद लोलयेकर यांचे आभारी आहोत.
क्षणचित्र : काजूर येथील बैठकीच्या आयोजनासाठी सरपंच श्री. गावकर यांनी विजेची व्यवस्था, समितीचा बॅनर लावणे, खुर्च्यांची मांडणी यांसाठी सहकार्य केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात