मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांचे पंचम प्रांतीय हिंदू अधिवेशन १२ आणि १३ नोव्हेंबर या कालावधीत उल्हासनगर येथे होत आहे. त्याच्या प्रथम दिवशी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेले विचार येथे देत आहोत.
सत्र १ : धर्मावरील आघात रोखण्यासाठी केलेले कृतीशील प्रयत्न हिंदुत्वनिष्ठांच्या शब्दांत
धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी हिंदूंनी अष्टावधानी व्हायला हवे ! – स्वप्नील यादव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
परळ येथील पू. भिडेगुरुजी यांच्या व्याख्यानात काही पुरोगामी महिलांनी सभेला विरोध करण्यासाठी पू. भिडेगुरुजी यांचा जातीवाचक उल्लेख करून मराठा आरक्षणाचे सूत्र उपस्थित केले. आम्ही त्यांना समर्पक उत्तर दिल्यानंतर त्यांनी काढता पाय घेतला. याविषयी एका वृत्तपत्राने काँग्रेसने पू. भिडे यांची सभा उधळून लावली असे चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले. याविषयी संबंधित वृत्तपत्रांना आम्ही क्षमा मागायला भाग पाडले. ढोंगी प्रसारमाध्यमांद्वारे साम्यवादी आणि पुरोगामी हिंदुत्वाला विरोध करतात. अशा प्रकारे धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी हिंदूंनी अष्टावधानी व्हायला हवे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. स्वप्नील यादव यांनी केले. प्रसारमाध्यमांच्या हिंदुद्रोहाला संघटितपणे सनदशीर मार्गाने विरोध कसा करावा, याविषयी त्यांनी माहिती दिली.
हिंदु संघटनांनी एकत्र येऊन लढा दिला, तर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे कठीण नाही ! – मंगेश म्हात्रे, युवा प्रभारी, हिंदू महासभा, नवी मुंबई
सर्वोच्च न्यायालयाने अनधिकृत प्रार्थनास्थळे पाडण्याचा आदेश दिल्यानंतर प्रशासनाकडून घणसोली येथील एक हनुमानाचे मंदिर पहाटे ३ वाजता पाडण्यात आले. या घटनेनंतर नवी मुंबई हिंदु ब्रेन्स या धर्माभिमान्यांच्या गटाने एक लढा देवासाठी या अंतर्गत मंदिरे वाचवण्याची मोहीम चालू केली. सामाजिक संकेतस्थळांवर, तसेच प्रसारमाध्यमांमध्ये या मोहिमेला चांगली प्रसिद्धी देण्यात आली. नवी मुंबईतील ज्या मंदिरांना महानगरपालिकेने नोटीस दिली होती त्या मंदिरांच्या विश्वस्तांची आम्ही भेट घेतली. ग्रामस्थ, वारकरी संप्रदाय तसेच अन्य संघटनांची मिळून नवी मुंबई मंदिर समिती स्थापन करण्यात आली. याद्वारे जी अनधिकृत मंदिरे अधिकृत होऊ शकतात, ती त्वरित अधिकृत करण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकण्यात आला. या संघटनामुळे प्रशासनाने एका मंदिरावर कारवाई करण्याचे पुढे ढकलले. हिंदु संघटनांनी अशाप्रकारे एकत्र येऊन लढा दिला, तर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे कठीण नाही !
तन-मन-धन अर्पण करून धर्मकार्य करूया ! – मोतीराम गोंधळी, अध्यक्ष, हिंदू राष्ट्र जनजागरण समिती, डायघर, ठाणे
दिवा येथे नायजेरियन लोकांनी समाजाला व्यसनाधीन बनवण्याचा विडाच उचलला आहे. पैशांच्या लोभामुळे काही जण त्यांना रहाण्यासाठी खोल्या देतात. दिवा शहर नायजेरियन मुक्त करण्याचे कार्य आम्ही करत आहोत. यासाठी आम्हाला देवाचे आणि संतांचे आशीर्वाद लाभत आहेत. धर्मकार्य करत असतांना भगवंताचे अधिष्ठान असेल, तर कार्यात यश मिळते. धर्माचे कार्य करत असतांना वेळोवेळी मला धर्मांधांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. धर्माचे कार्य हे ईश्वराचे कार्य आहे. त्यामुळे तन-मन-धन अर्पण करून धर्मकार्य करूया !
हिंदूंना गायींचे महत्त्व पटवून देण्याची आवश्यकता आहे. – संदीप शर्मा, गोरक्षक, खारघर
खारघर येथे गोमांसाची वाहतूक होत असतांना मी पोलिसांत याविषयी तक्रार दिली. यासाठी मला २ दिवस कामावरून सुटी घ्यावी लागली. मी शासकीय नोकरी करत असून गोरक्षणाचे कार्य केल्यास ती जाऊ शकते, असा विचार आला; मात्र या कार्यात आध्यात्मिक ऊर्जा असल्याने ही भीती निघून गेली. ३३ कोटी देवतांचे अस्तित्व असलेल्या आणि सर्वांना पूजनीय असलेल्या गोमातेची हत्या केली जाते. राज्य शासनाने गोहत्या बंदी कायदा तर केला आहे; मात्र गायरान भूमी ठेवली नाही. त्यामुळे रस्त्यावर भटकत असलेल्या गायी प्लास्टीक पिशव्या आणि कचरा खाऊन जगतात. पूर्वी प्रत्येक हिंदूंच्या घरात गाय होती. आता मात्र गायी रस्त्यावर फिरतांना आढळतात. हिंदूंना गायींचे महत्त्व पटवून देण्याची आवश्यकता आहे.
अनधिकृत भोंगे आणि मदरसे यांना हिंदूंनी संघटितपणे विरोध करायला हवा. – उदय ठोंबरे, गटप्रमुख, शिवसेना, गोवंडी
गोवंडी भागात बांधण्यात येत असलेल्या एका अनधिकृत मदरशाच्या विरोधात आम्ही महानगरपालिकेमध्ये तक्रार करून त्याचे बांधकाम रहित करण्यास भाग पाडले. या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून आम्हाला कोणतेच साहाय्य मिळाले नाही. पाडण्यात आलेल्या मदरशाचे पुन्हा बांधकाम करण्यात येत आहे. तसेच हिंदूंना अनधिकृत भोंग्यांचाही नाहक त्रास सहन करावा लागतो. भोंग्यांच्या आवाजामुळे मंदिरात आरती करण्यात अडचण येते. अनधिकृत भोंगे आणि मदरसे यांना हिंदूंनी संघटितपणे विरोध करायला हवा.
सत्र २ : धर्मशिक्षणवर्गात येऊ लागल्यावर हिंदुत्वनिष्ठांकडून होऊ लागलेल्या धर्माचरणाच्या कृतींविषयी त्यांचे मनोगत
प्रत्येक हिंदूने धर्मशिक्षण घ्यावे ! – सुमित कदम, धर्माभिमानी
हिंदु धर्म म्हणजे काय, धर्माचे महत्त्व काय हे मला हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून समजले. धर्मशिक्षणामुळे उत्सवांतील अपप्रकार, तसेच धर्मावरील आघात रोखता येतील. यासाठी प्रत्येक हिंदूने धर्मशिक्षण घ्यावे !
दैनिक सनातन प्रभात च्या वाचनातून मला धर्मशिक्षण मिळाले आणि धर्माचे महत्त्व लक्षात आले ! – संतोष पाण्डेय, धर्माभिमानी
पूर्वी मला राग यायचा. असे कशामुळे होते हे लक्षात येत नव्हते. धर्मशिक्षणवर्गात गेल्यावर त्यामध्ये सांगितल्यानुसार मी नामजप चालू केला. त्यानंतर मला त्यामागील कारणे लक्षात आली. दैनिक सनातन प्रभात च्या वाचनातून मला धर्मशिक्षण मिळाले आणि धर्माचे महत्त्व लक्षात आले. हिंदूंनी धर्मशिक्षणाच्या माध्यमातून धर्म जाणून घ्यायला हवा.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यासोबत काम केल्यामुळे हिंदुत्व समजले ! – करण बाबडे, धर्माभिमानी
मूळात हिंदु धर्म म्हणजे काय हेच देशातील लोकांना समजत नव्हते. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यासोबत काम केल्यामुळे आम्हाला खरे हिंदुत्व समजले. काही शाळांमध्ये विद्यार्थींनींना धर्माचरण करण्यास बंदी घालण्यात येत होती. आम्ही या हिंदुविरोधी कृतींना शाळांमध्ये जाऊन विरोध केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात