जातीद्वेषापोटी इतिहासाचा चुकीचा अर्थ पसरवून अघोरी कृत्यांनी समाजात तेढ निर्माण करणारे असहिष्णूच नव्हेत का ?
जळगाव : भारत मुक्ती मोर्चा, संभाजी ब्रिगेड आणि समविचारी पुरो(अधो)गामी संघटना यांनी मिळून बलीप्रतिपदेच्या दिवशी बळीराजा पूजन आणि वामन पुतळा दहन यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. शहरातील काव्य रत्नावली चौकात भगवान वामन यांचा पुतळा जाळण्यात आला. (या संघटना निवळ ब्राह्मणद्वेषातून अशी घृणास्पद कृत्ये करून समाजात जातीयवाद वाढवण्यास खतपाणी घालतात. बळीराजा गरीब होता आणि ब्राह्मणाने त्याच्यावर अत्याचार केले अशा प्रकारे धादांत खोट्या इतिहासाचे भांडवल करून जातीद्वेष पसरवणार्या अशा संघटनांवर शासन योग्य ती कारवाई करेल का ? प्रत्यक्षात भगवंताने बळीराजाला पाताळात पाठवून त्याचा उद्धार केला आणि त्यागाने त्याच्या जीवनाला कलाटणी देऊन त्याच्यावर उपकारच केले, असा सत्य इतिहास आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले असून हिंदूंचे श्रद्धास्थान भगवान विष्णूचे अवतार वामन यांचा पुतळा दहन करण्याच्या निषेधार्थ बहुभाषिक ब्राह्मण संघ, दधिच नवयुवक मंडळ, बहुभाषिक महिला मंडळ, शाकद्विपीय ब्राह्मण संघ यांनी अप्पर जिल्हाधिकारी मनोहर चौधरी यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा अवतार असलेल्या वामन यांनी बळी राजाला पाताळात पाठवले होते, मारले नव्हते. मात्र काही जातीयवादी आणि पुरोगामी संघटना स्वत:ची प्रसिद्धी आणि स्वार्थ यांसाठी अपूर्ण आणि खोट्या माहितीच्या आधारे जनसामान्यांच्या मनात ब्राह्मण समाजाच्या विरोधात विष पेरण्याचे काम करत आहेत, तसेच या माध्यमातून जातीयवाद पसरवून दोन समाजात दुही माजवण्याचे कार्य करत आहेत. समस्त हिंदु समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान वामनाच्या पुतळ्याच्या दहनामुळे आम्हा हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि संबंधितावर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे घृणीत कृत्य पुन्हा करण्याचे धाडस कोणीही करणार नाही.
या वेळी बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष सुरेंद्र मिश्रा, सचिव शिवप्रसाद शर्मा, अशोक वाघ, पियुष रावळ, आदित्य धर्माधिकारी, बहुभाषिक महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुधा खटोड, सौ. विजया पांडे, सौ. छाया त्रिपाठी, दधिच समाजाचे उपाध्यक्ष राजकुमार जोशी, सचिव विनोद त्रिपाठी, समर्थ खटोड, भाग्येश त्रिपाठी, सिखवाल समाजाचे दिलीप सिखवाल, नंदकिशोर उपाध्याय, सौ भारती डवारे, सौ रेखा शर्मा यांच्यासह ब्राह्मण समाजातील महिला-पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात