हिंदु जनजागृती समितीच्या पिंपरी (पुणे) येथील शिबिराने धर्माभिमानी साधनेसाठी कृतीप्रवण !
पिंपरी : कालमहात्म्यानुसार व्यष्टी साधनेसमवेत समष्टी साधना आवश्यक आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. कारण त्यांच्या पाठीमागे श्री भवानीमाता, समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकाराम महाराज यांचा आशीर्वाद होता. व्यष्टी साधना हा कोणतेही कार्य सिद्धीस नेण्याचा पाया आहे. साधनेने स्वतःत पालट होतो आणि त्यामुळे त्या साधकासह त्याच्या संपर्कात येणार्या सर्वांना लाभ होतो. आपण सर्वांनी ईश्वराच्या आशीर्वादाने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटितपणे कार्यरत व्हायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. अभिजीत देशमुख यांनी केले. येथील बळीराज मंगल कार्यालय येथे १२ नोव्हेंबर या दिवशी पार पडलेल्या हिंदु धर्माभिमान्यांच्या शिबिरात केले.
शिबिराचे सूत्रसंचालन श्री. अभिजीत कुलकर्णी यांनी केले. या शिबिरात पिंपरी-चिंचवड, भोर, जुन्नर, मंचर, पुणे शहर आदी भागांतून ५० धर्माभिमानी सहभागी झाले होते.
समारोपाच्या प्रसंगी धर्माभिमान्यांनी व्यक्त केलेली मनोगते
१. श्री. युवराज पवळे – शिबीर चालू होतांना आपले शुद्धीकरण होत आहे, असे वाटत होते. आपण नामजप, प्रार्थना कृतज्ञता यांचा वापर करून समष्टी साधना करणार.
२. श्री अविनाश देसले – शिबिरामुळे नवीन ऊर्जा निर्माण झाली, असे वाटले.
३. श्री. अविनाश शेटे – सत्कर्म करण्यासाठी साधना पुष्कळ महत्त्वाची आहे. धर्मासाठी प्रतिदिन १ घंटा देईन.
४. श्री. सर्जेराव ढोकरे – शिबीर स्थळी श्रीकृष्णाचे अस्तित्व आहे, असे जाणवले.
५. श्री. अनिकेत हराळे – स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेची अनिवार्यता लक्षात आली.
६. श्री. हरिप्रसाद दामले – नामसाधनेत वृद्धी, धर्मशिक्षणवर्गात नियमितता आणि स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेला प्रारंभ या ३ गोष्टी करण्याचे ठरवले आहे. (शिबिराच्या ठिकाणी धर्माभिमान्यांना आध्यात्मिक गोष्टी जाणवणे, ही तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांना चपराकच आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
शिबिरामधील वैशिष्ट्यपूर्ण घटना
१. शिबिराचा उद्देश सांगून झाल्यावर धर्माभिमान्यांनी उत्स्फूर्तपणे साधनेमुळे त्यांच्यात झालेले पालट सांगितले.
२. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचे सत्र चालू असतांना ती प्रक्रिया बहुतेकांना नवीन असूनही तिच्या प्रत्यक्ष कृतीसाठी उपस्थितांनी त्यांचे दोष प्रांजळपणे सांगितले.
३. प्रायोगिक सत्रामध्ये कोणताही पूर्वानुभव नसतांना केलेला आंदोलनाचा सराव विशेष उल्लेखनीय ठरला.
असे झाले धर्माभिमान्यांचे शिबीर…
१. शिबिराच्या प्रारंभी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर शिबिराचा उद्देश प्रा. श्रीकांत बोराटे यांनी सांगितला.
२. ६३ प्रतिशत आध्यात्मिक स्तर असलेले श्री. अभिजीत देशमुख यांनी धर्माभिमान्यांना मार्गदर्शन केले.
३. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवतांना स्वयंसूचना कशी द्यावी, याच्या प्रसंगासह सोदाहरण मार्गदर्शन ६५ प्रतिशत आध्यात्मिक स्तर असलेल्या कु. वैभवी भोवर यांनी केले.
४. राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या सिद्धतेचा प्रायोगिक सराव, प्रत्यक्ष आंदोलन करणे, त्या वेळी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास अथवा व्यत्यय आल्यास घ्यावयाची काळजी, आंदोलनाची प्रसिद्धी करणे आणि जिल्हाधिकार्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देणे आदी गोष्टींचा या प्रयोगामध्ये समावेश होता.
५. प्रायोगिक आंदोलनाच्या वेळी झालेल्या चुका आणि त्यावरील उपाययोजना यासंबंधी समितीचे सर्वश्री अभिजीत देशमुख आणि कृष्णाजी पाटील यांनी मार्गदर्शन केले.
६. त्यानंतर धर्माभिमान्यांची गटचर्चा झाली. त्यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन प्रत्यक्ष साधना आणि सेवा यांचे नियोजन केले.
७. शिबिराची सांगता कृतज्ञतापूर्वक म्हटलेल्या सदगुरूंच्या श्लोकाने झाली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात