मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १०००च्या नोटा रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर कश्मीर खोऱ्यात कमालीची शांतता निर्माण झाली असून दगडफेक किंवा हिंदुस्थान विरोधातील घोषणाबाजी बंद झाल्याचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. फुटीरतावाद्यांच्या कृत्यांना त्यामुळे चाप बसल्याचेही पर्रीकर म्हणाले.
गेले काही महिन्यांनपासून काश्मीर खोऱ्यात फुटीरतावाद्यांकडून हिंदुस्थान विरोधात वातावरण तापवले जात होते. दिवसेंदिवस काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती चिघळत चालली होती. पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक करणे, तसेच हिंदुस्थान विरोधातील घोषणाबाजी करणे, पाकिस्तान, इसिसचे झेंडे फडकवणे असे प्रकार सुरू होते. ‘कश्मीरमधील तरुणांना दगडफेक करण्यासाठी ५०० रुपये आणि आणि अन्य अडथळे निर्माण करण्यासाठी १००० रुपये दिले जायचे. पण पंतप्रधान मोदींनी नोटा बंदींच्या केलेल्या घोषणेमुळे दहशतवाद्यांचे फंडिंग शून्यवर आले आणि हे सारे प्रकार थांबले’, असे मनोहर पर्रीकर म्हणाले.
मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचे कौतुक केले. देशाच्या सीमा सुरक्षा असो किंवा आर्थिक सुरक्षा असो, पंतप्रधान मोदींनी नेहमीच धाडसी निर्णय घेतले, असे पर्रीकर म्हणाले. जवानांकडून जे पाऊल उचलले जाते त्याला पंतप्रधान कायम पाठिंबा देतात, असेही त्यांनी सांगितले. मोदींनी अचानक केलेल्या घोषणेमुळे केवळ भ्रष्टाचार आणि काळापैसावाल्यांना चाप बसला नाही तर दहशतवाद्यांना होणारे फंडिंग थांबले, असे त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
संदर्भ : सामना