नवी देहली – जपानमध्ये ब्रह्मा, गणेश, गरुड, वायु, वरुण आदी हिंदु देवतांची पूजा केली जाते. नुकतेच देहलीमध्ये छायाचित्रकार बेनॉय बहल यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन येथे लावण्यात आले होते. त्यातून याची झलक दिसून आली.
बेनॉय यांच्यामते हिंदीतील काही शब्द जपानी भाषेतही वापरले जातात. उदाहरणार्थ ‘सेवा’ हा शब्द जपानी भाषेत त्याच अर्थाने वापरण्यात येतो. जपानमध्ये कोणत्याही प्रार्थनेचे अन्य भाषेत भाषांतर केले जात नाही. कारण त्यामुळे त्या प्रार्थनेतील शक्ती आणि त्याचा प्रभाव न्यून होईल, अशी त्यांची धारणा आहे.
जपानमध्ये सरस्वतीदेवीचे अनेक मंदिरे आहेत. तसेच संस्कृतमध्ये लिहिण्यात आलेली पांडू लिपी अनेक घरात आढळते. येथे ५ व्या शतकातील संस्कृत भाषेतील ‘सिद्धम’ नावाची पोथी अजूनही पहायला मिळते. जपानी भाषा ‘काना’ यात संस्कृतचे अनेक शब्द आहेत. कानाची निर्मिती संस्कृतपासून झाली आहे.
जपानमधील मुख्य दूध आस्थापनाचे नाव ‘सुजाता’ आहे. या आस्थपानच्या अधिकार्याने सांगितले की, भगवान बुद्ध यांना निर्वाणाच्या वेळी ज्या युवतीने खीर खाण्यास दिली होती, तिचे नाव ‘सुजाता’ होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात