डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’वरील बंदीचे स्वागत !
मुंबई – ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’च्या माध्यमातून डॉ. झाकीर नाईक आतंकवादी कारवाया करण्यासाठी मुसलमान युवकांना प्रोत्साहन देत होते, तसेच विदेशातून कोट्यवधी रुपये घेऊन भारतात मुसलमानेतरांचे धर्मांतर करून त्यांनाही आतंकवादी कारवायांकडे वळवत होते. देशाची शांतता, सामाजिक सलोखा आणि सुरक्षा धोक्यात आणणारे डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’वर केंद्रशासनाने बंदी आणण्याच्या निर्णयाचे हिंदु जनजागृती समिती स्वागत करत आहे. आता अटकेच्या भीतीने विदेशात लपलेल्या डॉ. नाईक यांचे प्रत्यार्पण करून घेऊन त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे डॉ. नाईक आणि त्यांच्या संस्थेच्या माध्यमांतून होणार्या आतंकवादी कारवायांना आळा बसेल, असे यात पुढे म्हटले आहे.
१. वर्ष २०१२ मध्ये डॉ. झाकीर नाईक यांनी हिंदूंचे आराध्य दैवत श्रीगणेश आणि भगवान शिव यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. त्या वेळी सर्वप्रथम हिंदु जनजागृती समितीने समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना सोबत घेऊन त्यांच्या विरोधात देशव्यापी आंदोलन छेडले.
२. हिंदु जनजागृती समितीने डॉ. नाईक यांच्या आतंकवादी कारवायांतील सहभागाविषयी, तसेच जगभरात त्यांच्यावर घालण्यात येणार्या प्रतिबंधांविषयी सर्व पुरावे आणि माहिती गोळा करून तत्कालीन केंद्रीय गृहमंत्र्यांना सादर केली होती.
३. समितीच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात मुंबई, कोल्हापूर, अकोला आणि सावंतवाडी या चार ठिकाणी एफ्आयआर् प्रविष्ट करण्यात आले; मात्र तत्कालीन काँग्रेस शासनाने त्याकडे हेतूतः दुर्लक्ष केले.
४. डॉ. नाईक यांच्या ‘पीस टी.व्ही.’ या वाहिनीवर केंद्रशासनाने यापूर्वीच बंदी घातली असली, तरी त्याचे चालू असलेले अवैध प्रसारण पूर्णपणे बंद व्हावे, यासाठी समिती सातत्याने आवाज उठवत आहे. त्यावरही शासनाने त्वरित कारवाई करावी, तसेच लहान मुलांच्या कोवळ्या मनावर विद्वेषी शिक्षणाचा प्रभाव टाकणार्या डॉ. नाईक यांच्या ‘पीस स्कूल’वरही बंदी आणण्यात यावी, अशी मागणीही हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात