कात्रज (पुणे) येथील संत खेतेश्वर आश्रम येथे दुमदुमली हिंदु राष्ट्र स्थापनेची गर्जना !
पुणे : भारतात लव्ह जिहाद, धर्मांतर या समस्यांसमवेतच आता ‘इसिस’ने शिरकाव केला आहे. काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादामुळे ४ लक्ष ५० सहस्र हिंदूंना एका रात्रीत विस्थापित व्हावे लागले. काश्मीरप्रमाणे येथील परिस्थिती होऊ नये आणि समाजविघातक गोष्टींना विरोध करणे, यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे. महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगलांविरुद्ध लढा देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले, तसे सर्व हिंदूंनी संघटित होऊन २०२३ मध्ये आपल्याला हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. चैतन्य तागडे यांनी केले. त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त येथील कात्रज भागातील संत खेतेश्वर आश्रम येथे १४ नोव्हेंबर या दिवशी अखिल राजस्थानी समाज संघ यांच्या वतीने पुरुषांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी अखिल राजस्थानी समाज संघाचे महासचिव श्री. मोहनसिंह राजपुरोहित, खजिनदार श्री. गणेश डांगी, पूर्वअध्यक्ष श्री. बाबू सिंह मादा, देवासी समाजाचे अध्यक्ष श्री. मोलारामजी देवासी, राजपुरोहित समाज संस्थेचे अध्यक्ष श्री. जयसिंह राजपुरोहित आणि अन्य मान्यवर यांच्यासह २०० हून अधिक धर्माभिमानी पुरुष उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गजानन केसकर यांनी केले.
आपल्या मुलींना राणी पद्मिनीचा आदर्श घेण्यास शिकवा ! – कु. मोनिका गावडे
‘सध्याच्या अभिनेत्रींचे शील भ्रष्ट झालेले आहे. त्यामुळे आजच्या तरुणींनी इंग्रजांविरुद्ध लढा देणार्या झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि शीलरक्षणासाठी जोहार करणार्या राणी पद्मिनी यांचा आदर्श घ्यायला हवा.
तसेच आपली मुलगी योग्य दिशेने वाटचाल करत आहे ना, याकडे लक्ष द्यायला हवे. आपल्या मुलींना कोणत्या दिशेने न्यायचे, हे मातांनी ठरवले पाहिजे. आजच्या तरुणींनी धर्मांधांच्या ‘लव्ह जिहाद’ सारख्या युक्त्यांना बळी न पडता स्वतः धर्माचे शिक्षण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. संकटकाळी केवळ देवच आपल्या साहाय्यासाठी येणार असल्याने नियमित कुलदेवतेची उपासना करा’, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या कु. मोनिका गावडे यांनी केले. अखिल राजस्थानी समाज संघ यांच्या वतीने महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या मार्गदर्शन करत होत्या. या वेळी १२५ महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. क्रांती पेटकर यांनी केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात