चेन्नई : तमिळनाडूतील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येऊन हिंदु परिवाराची स्थापना केली. भविष्यातील कार्यक्रम निश्चित करण्यासाठी या परिवाराची मदुराई येथे १३ नोव्हेंबर या दिवशी बैठक पार पडली. या बैठकीत विविध संघटनांचे ४५ नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या बैठकीत शिवसेना, अखिल भारतीय हिंदु महासभा, हिंदु मक्कल कच्छी, हनुमान सेना, विवेकानंद केंद्र, अखिल भारतीय हिंदु मक्कल सेना, हिंदु सत्य सेना, हिंदु मक्कल मुन्नेत्र कळघम्, इंदू देसिया कच्छी, हिंदु एलयंगार एळूची पेरवई, हिंदु जनजागृती समिती इत्यादी संघटना सहभागी झाल्या होत्या. बैठकीचा प्रारंभ प्रार्थनेने झाला. भारत हिंदुमुन्नानीचे श्री. आर्.डी. प्रभू यांनी गेल्या मासांत हिंदु परिवाराने केलेल्या कार्याची माहिती दिली. उपस्थित सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम लुकतुके आणि सौ. उमा रविचंद्रन् उपस्थित होते.
दुपारच्या सत्रात सर्व उपस्थित हिंदुत्वनिष्ठ मदुराई शहराच्या मध्यवर्ती भागात एकत्र आले आणि त्यांनी केंद्रशासनाकडे समान नागरी कायदा त्वरित अमलात आणण्याची मागणी केली.
क्षणचित्रे
१. सुमारे २० हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्र येऊन कोणत्याही संघटनेचा ध्वज न घेता आणि राष्ट्रीय हितासाठी केलेले हे निषेध आंदोलन आगळेच होते. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा आत्मविश्वास वाढून आपण एकटे नसल्याची जाणीव दृढ झाली.
२. शिवसेनेचे श्री. राधाकृष्णन् यांनी बैठक हिंदु जनजागृती समितीच्या बैठकीप्रमाणे शिस्तबद्ध व्हायला पाहिजे, यासाठी दक्षता बाळगली. वेळोवेळी त्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन घेतले.
३. श्री. प्रभू आणि श्री. संतोष यांनी सर्व उपस्थितांनी कापूर आणि अत्तर यांद्वारे आध्यत्मिक उपाय करावे, अशी विनंती केली. ती मान्य झाली.
४. एका हिंदुत्वनिष्ठाने हिंदु धर्मावर आधारित सत्संग घेण्याची, तर दुसर्याने स्व-संरक्षण प्रशिक्षणवर्ग घेण्याची सिद्धता दाखवली. अन्य एकाने हिंदुत्वनिष्ठांना विनामूल्य कायदेशीर साहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
५. ही बैठक आणि निषेध आंदोलन यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे श्री. जेयाम पंदियान यांनी पुष्कळ परिश्रम घेतले.
आंदोलनासाठी पोलिसांची अनुमतीही वेळेवर मिळाली. २ पोलीस अधिकार्यांनी या आंदोलनाचे ध्वनीचित्रीकरण केले. (हिंदुत्वनिष्ठांच्या आंदोलनाचे ध्वनीचित्रीकरण करण्यात वेळ घालवण्यापेक्षा हिंदुत्वनिष्ठांच्या होणार्या हत्या आणि त्यांच्यावरील आक्रमणांच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी जिहाद्यांवर कारवाई करण्यास वेळ दिला असता, तर ते अधिक योग्य झाले असते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात