द्वारकानगरीत चतुर्थ अखिल भारतीय पंचगव्य चिकित्सा महासंमेलनाला प्रारंभ ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
द्वारकानगरी (गुजरात) – आज जो तो केवळ भाषणे ठोकण्यात मग्न असतो; परंतु प्रत्यक्ष कृती करण्यास कोणी पुढे येत नाही. जोपर्यंत भारतीय स्वतः काही करणार नाहीत, तोपर्यंत भारताचा उत्कर्ष होणे शक्य नाही. देशाला वाचवण्यासाठी भाषण नव्हे, तर पुरुषार्थ करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जलक्रांतीचे प्रवर्तक, गीर गायींचे पुनरुज्जीवक आणि प्रोटेक्ट फार्मास्युटिकल्स या आस्थापनाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. मनसुखभाई सुवागीया यांनी १९ नोव्हेंबर या दिवशी येथे केले. ते लेउवा पटेल समाज भवन, द्वारका, गुजरात येथे आरंभ झालेल्या चतुर्थ अखिल भारतीय पंचगव्य चिकित्सा महासंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. पंचगव्य आणि गोविज्ञान याविषयी ज्ञानवृद्धी होण्यासाठी प्रतिवर्षी तीर्थक्षेत्री महासंमेलनाचे आयोजन केले जाते. या वर्षी १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत द्वारकानगरीत महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री. मनसुखभाई सुवागीया पुढे म्हणाले, भारतात सर्वत्र गीर गायी पाळणे योग्य नाही. भगवंताने त्या त्या भूभागासाठी वैशिष्ट्यपूर्ण गायी निर्माण केल्या आहेत. आज भारतीय गायींच्या १० हून अधिक प्रजाती प्रतिदिन प्रत्येकी १५ लिटरपेक्षा अधिक दूध देऊ शकतात; पण सरकार देशी गायींच्या खच्चीकरणासाठी देशी गायी फार अल्प दूध देतात, असा अहवाल देत आहे. भारतीय जनतेला डॉबरमॅन, आल्सेसियन आदी कुत्र्यांच्या विदेशी प्रजातींची नावे माहीत आहेत; परंतु भारतीय वंशाच्या गायींच्या प्रजातींची नावे माहीत नाहीत, ही शोकांतिका आहे. केवळ गीर गायीच्याच मूत्रामध्ये सोने असते, असे नाही, तर सर्वच भारतीय गायींच्या मूत्रात सोने आढळते. शेतकर्याने त्याच्या स्थानिक शुद्ध देशी प्रजातीच्या गायीचे ५० ग्रॅम वाळवलेले शेण, १०० मिली गोमूत्र आणि ५० मिली तूप माझ्या पत्त्यावर पाठवल्यास मी त्याची प्रयोगशालेय परीक्षणे करून शेतकर्याला अहवाल पाठवून देईन.
कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात सूर्ययोगी उमाशंकरजी यांनीही मार्गदर्शन केले, तसेच त्वरित ऊर्जा देणार्या काही श्वसनक्रिया उपस्थितांकडून करवून घेतल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गव्यसिद्धाचार्य निरंजन वर्मा यांनी केले. या वेळी गव्यसिद्धाचार्य निरंजन वर्मा यांच्या २ ग्रंथांचे, तसेच त्यांच्या व्याख्यानांच्या पेन ड्राइव्हचे प्रकाशन करण्यात आले.
मनसुखभाई यांनी केलेले कार्य
मनसुखभाई यांनी ५ वर्षे स्वतः श्रमदान करून, तसेच सौराष्ट्रातील शेतकर्यांना संघटित करून कोणत्याही शासकीय यंत्रणांच्या साहाय्याविना ३०० गावांत ३ सहस्र बंधारे बांधले. यामुळे पूर्वी ७०० फूट खोलही जेथे पाणी सापडत नव्हते, अशा ठिकाणी आता सर्व कूपनलिका पाण्याने भरून गेल्या आहेत. २००३ या वर्षी गुजरात राज्यात गीर गायी नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या. मनसुखभाई यांनी स्वतः गीर गाय हमारे आंगनमें (गीर गाय आमच्या अंगणात) ही योजना चालू करून गुजरातच्या १२ सहस्र गोपालकांना गोपालनासाठी उद्युक्त केले. याचा परिणाम म्हणून २००३ पासून आजपर्यंत गुजरात राज्यात गीर गायींची संख्या ५ सहस्रांवरून २ लक्ष झाली आहे.
क्षणचित्रे
१. उद्घाटन सत्राच्या आरंभी जुन्या द्वारका गावात प्रभातफेरीचे आयोजन केले होते. या फेरीमध्ये गोमातेचे महत्त्व सांगणारे फलक धरून जनजागृती करण्यात आली. या फेरीचे प्रतिनिधित्व सूर्ययोगी उमाशंकरजी यांनी केले. द्वारकानगरीतील बहुतेक लोक गुटख्याच्या व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. गुटख्यामुळे तोंड बंद असणारी व्यक्ती स्वतःवर होणार्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकत नाही. यासाठी व्यसनमुक्तीविषयी प्रबोधन करणारे फलकही या फेरीतील कार्यकर्त्यांनी हाती धरले होते.
२. कार्यक्रमस्थळी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात