अगदी अलीकडील काळापर्यंत १३-१४ वर्षांचे वय म्हणजे चांगले शिकायचे, खेळायचे आणि भावंडांशी मस्ती करण्याचे वय, अशी व्याख्या होती. त्यानंतर उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहून त्यासाठी करियरसाठी मेहनतीला आरंभ होत असे; परंतु आता १३-१४ वर्षांच्या कोवळ्या वयात मुले-मुली खोटे प्रेम या संकल्पनेत गुरफटून जात असल्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. पूर्वी मुले महाविद्यालयातील अभ्यासाच्या तासिकांनाच दांडी मारायची; पण आता शाळेलाच दांडी मारून उज्ज्वल भविष्याकडे पाठ फिरवून प्रेमाच्या जाळ्यात गुंतून वेळ घालवत असल्याचे चित्र दिसते. मुलांची ही सैरभैर वागणूक पालकांच्या दृष्टीत येतेच ! त्यावर उपाय म्हणून पालक मुलांना समजावून सांगतात आणि न ऐकल्यास मार देतात. अशा वेळी प्रेम टिकवायचे कि आई-वडिलांचे ऐकायचे, अशा मन:स्थितीत काही मुलांची जीव देण्यापर्यंत मजल जात आहे.
पूर्वी महाविद्यालयांमध्ये असलेले प्रेमाचे वेड आता थेट शाळांमध्ये येऊन पोचण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील बागा, शाळांचे रस्ते येथे शाळकरी जोडपी प्रेमाच्या गोष्टी करतात. शाळा भरतांना किंवा सुटतांना शाळेच्या बाहेरील टोळक्यांच्या दृष्टीतूून मुलींची सुटका होणे अशक्यच ! यातूनच मुलींची छेडछाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. या घटना रोखण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याला शाळांच्या परिसरात गस्त वाढवण्याच्या सूचना आहेत. काही ठिकाणी महिला पोलिसांच्या दामिनी पथकांनी रोडरोमिओंना ठोकून वठणीवर आणले; परंतु मुलामुलींची तथाकथित प्रेमप्रकरणे रोखण्यावर तोडगा सापडलेला नाही. या मुलांचे समुपदेशन करायचे तरी कसे, असा प्रश्नही पडतो.
पुण्यातच गेल्या २ मासांत अनेक शालेय मुलींनी त्यांचेे आयुष्य गमावले आहे. पोलिसांनी या सर्व प्रकरणांचा तपास केला असता, शालेय मुली शाळेला दांडी मारून मित्रांसमवेत फिरायला गेल्याचे पालकांना कळले. मुलींच्या कुटुंबियांनी घरी येण्यास सांगितल्यानंतर घाबरून मुलींनी आत्महत्या केली. अशा घटनांमुळे पालकांच्या काळजाचा ठोका चुकलाच; पण पोलीसही चक्रावून गेले आहेत. आई-वडील दिवसभर कामावर जातात. मुलांशी संपर्कात रहाण्यासाठी ते भ्रमणभाष देतात; पण त्याचे वाईट परिणाम समोर येत आहेत.
मुलांच्या ओठावर कोणते गाणे आहे, यावर देशाचे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे पालक आणि शिक्षक यांनी स्वत: उच्चतम अशा हिंदु संस्कृतीचे ज्ञान घेऊन ते मुलांना द्यावे. प्रेम ही संकल्पना मुलगा-मुलगी एवढ्यावरच सिमीत नसून त्याची व्यापकताही त्यांना लक्षात आणून द्यायला हवी. प्रत्येक प्राणीमात्रावर प्रेम करण्यास शिकवणार्या महान हिंदु धर्माची आणि देशाच्या इतिहासाची जाणीव करून देऊन, जीवनाचे व्यापक ध्येय समोर ठेवून, धर्माचरण करण्यास उद्युक्त करून आपण आपली मुले संस्कारक्षम करायला हवीत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात