भाग्यनगर – चित्तूर-तिरुपती रस्त्यावरील पेरुरू या गावात असलेल्या वाकुलामाता मंदिराचे पुनरुज्जीवन करण्याचा तिरुपती-तिरुमला देवस्थानने घेतलेला निर्णय हैदराबाद उच्च न्यायालयाने कायम केला. हे मंदिर श्रीकृष्णाची पालन करणारी आई यशोदामातेचे आहे.
हे प्राचीन मंदिर एका मोठ्या दगडावर वसलेले आहे; मात्र काही हितसंबंधी व्यक्तींनी मंदिराच्या जागेवर दगड खणण्याचे काम करणार्या कामगारांवर बेकारीची कुर्हाड कोसळेल; म्हणून हे मंदिरच इतर ठिकाणी हालवावे, अशी विनंती देवस्थानला केली होती. त्याप्रमाणे या मंदिराचे स्थलांतर करण्याचा निर्णय तिरुपती-तिरुमला देवस्थानने वर्ष २००५ मध्ये घेतला होता; मात्र वर्ष २००९ मध्ये परत या निर्णयावर फेरविचार करून आहे तेथेच मंदिराचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाने दुखावलेल्या हितसंबंधियांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन या निर्णयाला आव्हान दिले. याबरोबरच श्री पीठाचे पदाधिकारी आणि दूरदर्शनचे माजी संचालक आर्.व्ही.व्ही. कृष्णराव यांनीही एक याचिका दाखल करून ‘यशोदा मंदिराच्या परिसरात खाणकाम करणारे अवैधरित्या खनन करत आहेत. त्यांच्याजवळ योग्य विभागाची अनुमती नाही; म्हणून त्यांची मंदिर हालवण्याची मागणी मान्य करू नये’, असे म्हणणे उच्च न्यायालयात मांडले.
या दोन्ही याचिकांची एकत्र सुनावणी होऊन न्या. चल्ल कोदंड राम यांनी मंदिर हालवण्याची मागणी फेटाळून लावली आणि तिरुपती-तिरुमला देवस्थानच्या मंदिराचे पुनरुज्जीवन करण्याच्या निर्णयाला संमती दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात