संजय साडविलकर यांच्या विरोधात पाचवी तक्रार प्रविष्ट
दोषींवर कारवाई होण्यासाठी पाठपुरावा घेणारे पू. भिडेगुरुजी यांचा आदर्श सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठांनी घ्यावा ! वारंवार तक्रारी करूनही दोषींवर कोणतीही कारवाई न करणार्या पोलिसांवरही शासनाने कारवाई करावी, अशी हिंदूंची मागणी आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
सांगली : कोल्हापूर येथील संजय साडविलकर यांनी अवैधरित्या रिव्हॉल्व्हर आणि पिस्तुल बनवणे, हाताळणे, खरेदी-विक्री करणे, त्याची दुरुस्ती करणे इत्यादी गुन्हे केले आहेत. त्यांच्या विरोधात जिल्ह्यात चार पोलीस ठाण्यांत तक्रारी प्रविष्ट झाल्या आहेत. इतके असूनही संजय साडविलकर यांच्यावर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. तरी साडविलकर यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा प्रविष्ट करा, अशी मागणी श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याकडे केली आहे. समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २१ नोव्हेंबर या दिवशी सांगली येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यात आली. त्या वेळी ही मागणी पू. भिडेगुरुजी यांनी केली. या वेळी शिवसेना, भाजप आणि श्रीशिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साडविलकर यांच्यावर तात्काळ प्रथमदर्शनी अहवाल प्रविष्ट होणे अपेक्षित आहे. तो होईपर्यंत मी या प्रकरणाचा पाठपुरावा सोडणार नाही. त्यासाठी पोलीस महासंचालकांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत मी हा विषय घेऊन जाणार आहे. या प्रकरणात आम्ही सनातन संस्थेच्या समवेत आहोत, असेही पू. भिडेगुरुजी यांनी या वेळी सांगितले.
तक्रार प्रविष्ट केल्यावर साडविलकर यांच्यावर २४ दिवसांनंतरही कोणतीच कारवाई नाही !
संजय साडविलकर यांच्या विरोधात तासगाव येथे २९ ऑक्टोबर या दिवशी पहिली तक्रार प्रविष्ट झाली. यानंतर पलूस, कवठेमहांकाळ आणि सांगली येथे ३ तक्रारी प्रविष्ट झाल्या. साडविलकर यांच्या विरोधात २४ दिवसांनंतरही कोणतीच कारवाई न झाल्याने समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी श्री. शिंदे यांची भेट घेतली. ‘एकाच व्यक्तीच्या विरोधात सातत्याने तक्रारी प्रविष्ट होत असतांना पोलीस कोणाच्या दबावापोटी साडविलकर यांच्यावर कारवाई करण्याचे टाळत आहेत, अशी शंका नागरिकांच्या मनात उत्पन्न होत आहे’, असेही मत हिंदुत्वनिष्ठांनी या वेळी व्यक्त केले.
या वेळी सर्वश्री स्वप्नील पाटील, निवास पाटील, अरुण यादव, सचिन चव्हाण, संतोष पाटील यांसह अन्य उपस्थित होते. या निवेदनावर अधिवक्ता संतोष पाटील, अधिवक्ता शिरसाट, गोविंद सोवनी, विहिंपचे अभिजित घुले, भाजपचे विनय सपकाळ, राजेंद्र माळी, राजू पुजारी तसेच अन्य हिंदु धर्माभिमान्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
संजय साडविलकर आणि त्यांच्या सहकार्यांना तात्काळ अटक करा ! – सौ. आशाताई पोतदार यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार
संजय साडविलकर यांनी अवैधरित्या रिव्हॉल्व्हर आणि पिस्तुल बनवणे, हाताळणे, खरेदी-विक्री करणे, त्याची दुरुस्ती करणे इत्यादी गुन्हे केले आहेत. साडविलकर यांनी असे गुन्हे केल्याचा कबुलीजबाब न्यायाधिशांसमोर दिला आहे. त्यामुळे या कबुलीजबाबाच्या आधारे संजय साडविलकर, त्यांचे सहकारी बापू इंदुलकर आणि संगनमत करून अवैधरित्या शस्त्रविक्री करणारे सर्व यांच्यावर गुन्हे प्रविष्ट करून त्यांना अटक करावी, अशी तक्रार राष्ट्रप्रेमी नागरिक सौ. आशाताई पोतदार यांनी २१ नोव्हेंबर या दिवशी सांगली पोलीस मुख्यालयात प्रविष्ट केली आहे.
या तक्रारीमुळे साडविलकर यांच्या विरोधात प्रविष्ट झालेल्या तक्रारींची संख्या आता ५ झाली आहे.
सनातनचे साधक डॉ. तावडे यांना तात्काळ अटक करणारे पोलीस साडविलकर यांच्यावर राजकीय
दबावापोटी कारवाई करण्याचे टाळत आहेत का ?
संजय साडविलकर यांच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना तात्काळ अटक केली; मात्र तेच पोलीस अवैध शस्त्रविक्रीच्या गुन्ह्याखाली साडविलकर यांच्या विरोधात ५ तक्रारी प्रविष्ट होऊनही त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करणे, त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना अटक करणे, अशा कृती का करत नाहीत ? या संदर्भात राजकीय दबावामुळे पोलीस कारवाई करण्याचे टाळत आहेत, असे नागरिकांना वाटल्यास नवल ते काय ?
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात