Menu Close

देशद्रोही झाकीर नाईक यांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कारवाई करा !

  • पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदु आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी !

  • आंदोलनाचे फेसबूकवरून प्रथमच थेट प्रसारण !

rajendra_muthe
निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

पुणे :  आतंकवादाला प्रोत्साहन देणार्‍या आणि जाणीवपूर्वक धार्मिक द्वेष पसरवणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली आहे. हा निर्णय स्तुत्य असला, तरी एवढ्यावरच न थांबता केंद्र सरकारने फरार झालेल्या डॉ. झाकीर नाईक यांच्या मुसक्या आवळून त्यांचे भारतात प्रत्यार्पण करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी १९ नोव्हेंबर या दिवशी येथील विधानभवनासमोर झालेल्या राष्ट्रीय हिंदु आंदोलनात करण्यात आली. राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे प्रथमच फेसबूकवरून थेट प्रसारण करण्यात आले. हे आंदोलन हिंदु जनजागृती समितीच्या फेसबुक पानावर ‘लाईव्ह’ दाखवण्यात आले. या माध्यमातून एकूण १९ सहस्र ६८ जणापर्यंत आंदोलनाचा विषय पोचला. त्यांपैकी ३ सहस्र ६४९ जणांनी आंदोलन ‘लाईव्ह’ पाहिले. त्यावर १ सहस्र ६१५ जणांनी आवडल्याच्या किंवा अन्य प्रतिक्रिया (‘लाइक’ किंवा अन्य कॅमेंट्स) दिल्या.

या व्यतिरिक्त केरळ, कर्नाटक, तमिळनाडू आदी विविध राज्यांमध्ये जाणीवपूर्वक केल्या जाणार्‍या हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांचाही या वेळी तीव्र निषेध करण्यात आला. हिंदुत्वनिष्ठांच्या होणार्‍या हत्या या व्यापक सुनियोजित षड्यंत्राचा भाग असून या हत्यांची केंद्रीय अन्वेषण यंत्रणांच्या माध्यमातून सखोल चौकशी करावी आणि त्या राज्यांतील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणीही या प्रसंगी करण्यात आली. या आंदोलनामध्ये १०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. आंदोलनानंतर हिंदुत्वनिष्ठांच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना आंदोलनातील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

पुरोगाम्यांच्या हत्यांसाठी अनेक अन्वेषण यंत्रणा नेमणारे शासन हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांविषयी उदासीन का ? – चैतन्य तागडे

शासकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांमध्ये वाढ होत आहे. अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या होऊनही पोलीस, तसेच प्रशासकीय यंत्रणा त्याची दखल घेत नाहीत; उलट वैयक्तिक भांडणातून त्यांच्या हत्या झाल्याचे सांगतात. एरव्ही पुरोगाम्यांच्या हत्या झाल्यानंतर त्याचे अन्वेषण करण्यासाठी अनेक अन्वेषण यंत्रणांना कामाला लावणारे शासन अलीकडच्या काळात ३५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या होऊनही त्याची दखल घेत नाही, हे दुर्दैवी आहे. या समस्येवर हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय आहे.

झाकीर नाईकवरची कारवाई दिरंगाईने का ? – अधिवक्ता राजाभाऊ देशपांडे, हिंदु एकता आंदोलन पक्ष

वास्तविक पहाता देशद्रोही झाकीर नाईक याचे कारनामे ६ महिने आधीच उघड झाले होते. तरीही त्यांच्यावर कारवाई करण्यास एवढा विलंब का झाला ? हिंदूंवरच्या संकटांच्या विरोधात सर्वांनी संघटित होणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंमध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे.

अधिवक्ता देशपांडे यांनी मांडलेली अन्य सूत्रे

१. आरक्षणाचा अंत होऊन देशात समान नागरी कायदा लागू व्हावा.
२. निवडणुकीच्या काळात सरकारने जनतेला दिलेली आश्‍वासने पूर्ण होण्यासाठी जनतेनेही पाठपुरावा घ्यायला हवा.

हिंदूंवरील अन्यायाच्या प्रतिकारासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू ! – चंद्रशेखर शिंदे, लाल महाल उत्सव समिती

शासनाने हिंदूंवरील अन्यायाकडे डोळेझाक करणे निषेधार्ह आहे. हिंदू सहिष्णु असल्यानेच त्यांच्यावर अत्याचार होत आहेत; पण यापुढे हिंदूंवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही. त्याचा प्रतिकार करण्यासाठी आणि हिंदु धर्माच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याचीही आमची सिद्धता आहे. या प्रसंगी सनातन संस्थेचे श्री. निरंजन दाते यांनीही मनोगत व्यक्त केले.

आंदोलनात सहभागी हिंदुत्वनिष्ठ

हिंदु एकता आंदोलन पक्षाचे सर्वश्री दुर्गेश बारटक्के, अखिल राजस्थानी समाज संघाचे महासचिव श्री. मोहनसिंह राजपुरोहित, शिवसेनेचे हवेली तालुकाप्रमुख नितीन वाघ, गोर्हेगावचे माजी सरंपच सुशांत खिरिड, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाळकृष्ण वांजळे

क्षणचित्रे

१. अधिवक्ता राजीव / राजाभाऊ देशपांडे यांच्या कानाची नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती. तरीही ते आंदोलनाला उपस्थित होते. (देहभान हरपून धर्मकार्य करणारे असे धर्माभिमानी हीच हिंदु धर्माची खरी शक्ती ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. अधिवक्ता देशपांडे आणि श्री. चंद्रशेखर शिंदे यांनी त्यांच्या भाषणाच्या प्रारंभी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन प्रकट केले.

३. स्वातंत्र्यसैनिक अनंत कान्हेरे यांचे समकालीन असलेले काशिनाथ टोणपे यांचे पणतू श्री. संजय टोणपे यांनी आंदोलनाच्या समर्थनार्थ स्वाक्षरी करून ‘हिंदूंमध्ये जागृती होण्यासाठी अशा प्रकारची आंदोलने होणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.

४. अनेक जणांनी जिज्ञासेने आंदोलनाचा विषय जाणून घेतला, तसेच भ्रमणभाषमध्ये छायाचित्रेही काढली.

हिंदू आणि हिंदु धर्म यांवरील अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारे एकमेव संघटन !

हिंदू आणि हिंदु धर्म यांवर होणार्‍या आक्रमणांच्या विरोधात आवाज उठवणारे ‘हिंदु जनजागृती समिती’ हे एकमेव संघटन आहे, असे गौरवोद्गार अधिवक्ता राजाभाऊ देशपांडे यांनी या वेळी काढले.

हिंदुत्वनिष्ठांच्या होणार्‍या हत्या आणि त्यांच्या प्रती राज्यकर्ते, पोलीस, तसेच प्रशासन यांची असलेली उदासीनता दर्शवणारा जनजागृतीपर प्रसंग समितीच्या काही कार्यकर्त्यांनी वठवला. यामध्ये मृत हिंदू म्हणून एक कार्यकर्ता भूमीवर पडला होता. त्याच्या जवळ सरकार, पोलीस आणि प्रशासन यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या ३ व्यक्ती गांधीजींच्या माकडांप्रमाणे कान, तोंड आणि डोळे झाकून उभ्या होत्या.

hinduneta_hatya

‘हिंदूंवरचा अन्याय, हिंदू नेत्यांच्या होणार्‍या हत्या याविषयी आम्ही काही ऐकणार नाही, काही बोलणार नाही… मग करणार काय… केवळ डोळेझाक !!!’’ अशा शब्दांत सद्यस्थिती या प्रसंगातून ठळकपणे अधोरेखित करण्यात आली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *