द्वारकानगरी : देशभरात अनेक गोपालक लहान प्रमाणात पंचगव्यांपासून उत्पादने बनवतात. अशा उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीची काळजी असते. ही काळजी दूर करण्यासाठी, तसेच पंचगव्यांपासून बनणारी उत्पादने भारतासह विदेशातही उपलब्ध होण्यासाठी मार्च २०१७ पर्यंत ‘गव्य हार्ट’ या नावाने ऑनलाइन वितरण व्यवस्था निर्माण करणार आहोत, असे प्रतिपादन गव्यसिद्धाचार्य निरंजन वर्मागुरुजी यांनी द्वारका येथे चालू असलेल्या चतुर्थ अखिल भारतीय पंचगव्य चिकित्सा महासंमेलनाच्या दुसर्या दिवशीच्या दुपारच्या सत्रात केले. या संमेलनात भारतभरातून अनुमाने ९०० गोप्रेमी सहभागी आहेत. या वेळी ५९ पंचगव्य चिकित्सकांना व्यावसायिक प्रमाणपत्र देण्यात आले.
श्री. वर्मागुरुजी पुढे म्हणाले की, ‘गव्य हार्ट’ ही जगातील पहिली अशी व्यवस्था असेल, जिच्यात उत्पादन-निर्मिती विकेंद्रित असून वितरण व्यवस्था केंद्रित असेल. या सर्व व्यवस्थेच्या प्रमुखपदी महिला कार्यकर्त्या असतील. या व्यवस्थेचे एक ‘ऑनलाइन अॅप’ असेल. या अॅपद्वारे जगात कुठूनही पंचगव्यांच्या उत्पादनांची मागणी देता येईल.
भारतात प्रतीवर्षी अडीच कोटी गायींची कत्तल होणे, ही शोकांतिका ! – डॉ. सौ. शीला टावरी
पृथ्वी फाउंडेशनच्या डॉ. सौ. शीला टावरी म्हणाल्या की, भारतात प्राचीन काळी दुधाची विक्री होत नसे. गाय दुधासाठी नव्हे, तर शेतीसाठी पाळली जाई. गोहत्याबंदीच्या समर्थनार्थ गुजरात शासनाने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ‘गायीचे शेण कोहिनूर हिर्याहूनही मौल्यवान आहे’, असे म्हटले आहे. गोमूत्र हे सर्वांत चांगले कीटक नियंत्रक आहे. असे असूनही आज भारतात प्रतीवर्षी अडीच कोटी गायींची कत्तल केली जाते, ही शोकांतिका आहे.
पंचगव्य उपचारपद्धतीला ‘पर्यायी उपचारपद्धत’ म्हणणे चुकीचे !- डॉ. मणी, संचालक, सेल थेरपी इन्स्टिट्यूट, मदुरई, तमिळनाडू
सेल थेरपी इन्स्टिट्यूट, मदुरई, तमिळनाडूचे डॉ. मणी म्हणाले की, आज सर्व पौर्वात्य देशांमध्ये त्यांच्या स्वतःच्या उपचारपद्धतीला ‘मुख्य उपचारपद्धत’, तर अॅलोपॅथीला ‘पर्यायी (अल्टर्नेटिव्ह) उपचारपद्धत’ संबोधले जाते; परंतु जेथे जेथे इंग्रजांचे राज्य होते, तेथे तेथे अॅलोपॅथी ही मुख्य उपचारपद्धत आणि अन्य सर्व पर्यायी उपचारपद्धती आहेत. आम्ही अजूनही इंग्रजांच्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त झालेलो नाही, याचेच हे द्योतक आहे. खरे तर पंचगव्य चिकित्सेसारख्या सर्व भारतीय उपचारपद्धती या मुख्य उपचारपद्धती आणि अॅलोपॅथी ही पर्यायी उपचारपद्धत आहे.
वर्मागुरुजी यांनी समस्यांवरील उपाय सांगितला आहे ! – श्री. कमल टावरी
‘अतिरिक्त सोच कार्य नियोजन आयोगा’चे श्री. कमल टावरी यांनी त्यांच्या अध्यक्षीय समीक्षणात गव्यसिद्धाचार्य निरंजन वर्मागुरुजी यांच्या कार्याचा गौरव करतांना म्हटले की, आज जो तो केवळ स्वतःच्या समस्या सांगत असतांना निरंजन वर्मागुरुजी यांनी सर्व समस्यांवर उपायही सांगितला आहे.’
गव्यसिद्धाचार्य निरंजन वर्मागुरुजी यांच्याकडून सनातनच्या कार्याचा गौरव !
सकाळच्या सत्रात सर्वांना मार्गदर्शन करतांना गव्यसिद्धाचार्य निरंजन वर्मागुरुजी म्हणाले,‘‘धार्मिक विधींसाठी सर्वांनी सनातनचाच कापूर वापरावा; कारण तो शुद्ध आहे आणि सनातन संस्थाही अतिशय शुद्धतेने कार्य करत आहे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात