हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तुमकुर (कर्नाटक) येथे हिंदु धर्मजागृती सभा !
तुमकुर (कर्नाटक) – जिहादी आतंकवादामुळे आज जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंवर अन्याय होत आहे. युरोप आणि अमेरिका खंडांतील अनेक देशांमध्ये सनातन धर्माचे स्वागत केले जाते; मात्र दुर्दैवाने भारतीय पाश्चात्त्य संस्कृती अंगीकारून गुलामगिरी करत आहेत. धर्मांतर, लव्ह जिहाद, हिंदु नेत्यांच्या हत्या इत्यादी समस्यांनी हिंदू घेरलेले आहेत. या परिस्थितीत भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे, हाच विश्वात शांती नांदण्यासाठीचा उपाय आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा यांनी येथे केले. तुमकुरमधील श्री वसावी अमृत महाल, चिक्कापेटे येथे हिंदुत्व रक्षणासाठी, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी २० नोव्हेंबर या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. तुमकुर येथील सारापल्ली मठाचे श्री श्री श्री ज्ञानंदपुरी महास्वामी, सनातन संस्थेच्या सौ. गायत्री राव, रणरागिणी शाखेच्या कु. भव्या गौडा, तसेच उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या कु. दिव्या बाळेहितल यांनी मार्गदर्शन केले.
हिंदुत्वाचा अभिमान नसणे, हेच हिंदूंवरील सर्व समस्यांचे मूळ कारण ! – श्री श्री श्री ज्ञानंदपुरी महास्वामी
या धर्मजागृती सभेचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले आहे. हिंदु धर्मामध्ये सर्व गोष्टींविषयी प्रचंड ज्ञान असूनही हिंदू त्यांच्याच देशात हिंदुत्वाचे रक्षण करू शकत नाहीत. गर्भामध्ये असल्यापासून आई मुलाचे भविष्य घडवत असते; म्हणून प्रत्येक मातेने धर्माचरण करून मुलांना घडवायला हवे. प्रत्येकाने हिंदुत्वाचा अभिमान बाळगला पाहिजे. हिंदुत्वाचा अभिमान नसणे, हेच हिंदूंच्या सर्व समस्यांचे मूळ कारण आहे.
समाज, राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने स्वसंरक्षण घेऊन सिद्ध रहावे ! – कु. भव्या गौडा, रणरागिणी शाखा
आज जिहादी आतंकवाद, नक्षलवाद, गुंडगिरी यांमुळे समाज पूर्णपणे पोखरला गेला आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. तसेच समाज आणि राष्ट्र यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. अशा वेळी समाज, राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने स्वसंरक्षण घेऊन सिद्ध रहावे.
या वेळी सनातन संस्थेच्या सौ. गायत्री राव आणि उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या कु. दिव्या बाळेहितल यांनीही विचार मांडले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात