उज्जैैन : आज शिक्षणातून आपल्यासमोर रामाचा आदर्श ठेवला जात नाही. पूर्वी रामायणाच्या कथा वडीलधार्यांकडून सांगितल्या जात. त्यामुळे सर्व परिस्थितींमध्ये श्रीरामाप्रमाणे आदर्शपणे कसे वागायला हवे, याचे संस्कार सर्वांवर होत होते. रामायणाची शिकवण न मिळाल्यानेच आज घरातील कलह वाढले आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला रामायणाचा आदर्श युवकांसमोर ठेवावा लागेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले. ते येथील ‘पुरुषोत्तम सागर’च्या घाटावर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. येथील ‘सादर वन्दे’ या संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
श्री. शिंदे पुढे म्हणाले, ‘‘आज हिंदूंसमोर अनेक संकटे आहेत; पण प्रत्येक हिंदू विचार करतो, ‘मी एकटा काय करू ?’ हिंदूंनी असा विचार न करता प्रभु श्रीरामाने ज्याप्रमाणे रावणवध करण्यासाठी अयोध्येचे सैन्य न मागवता म्हणजेच राजाश्रयाचा विचार न करता वनवासात स्वतःची सेना उभारली, त्याप्रमाणेच धर्मावर प्रेम करणार्यांना संघटित करायला हवे. तमिळनाडू राज्यातील डीएम्के पक्षाचे अध्यक्ष करुणानिधी यांनी श्रीरामाची विटंबना करून श्रीरामसेतू तोडण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात रामसेतू तसाच राहिला असून आज त्यांच्या परिवारातच फूट पडली आहे, सख्खे भाऊ एक-दुसर्याच्या विरोधात उभे राहिले आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ज्या रामनामाने पाण्यात दगड तरले, त्या रामाचे नाव घेतल्यावर तो आपला उद्धार निश्चित होईल, अशी श्रद्धा बाळगून हिंदूंनी उपासनेचे बळ प्राप्त केले पाहिजे.
क्षणचित्रे
१. उज्जैन येथील श्री. भूपेंद्र गुलाटी आणि श्री. संजीव पांचाळ यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले.
२. कार्यक्रमाच्या पूर्वी ‘पुरुषोत्तम सागर’ या उज्जैन येथील सप्त सागरांपैकी एक असलेल्या ऐतिहासिक तलावाच्या काठी सामूहिक आरती करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात