संभाजीनगर येथे प्रांतीय हिंदू अधिवेशन
संभाजीनगर : फाटलेल्या नोटांप्रमाणे आज आपल्या हिंदु धर्माची स्थिती झाली आहे. ती पालटण्यासाठीच आपल्या साधू-संतांप्रमाणे संघटन करण्याची वेळ आली आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्व संप्रदाय आणि संघटना यांना एकत्र यावेच लागेल, सांप्रदायिक ऐक्य ही काळाची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे यांनी केले. ते महावीर भवन येथे संपन्न झालेल्या प्रांतीय हिंदू अधिवेशनात बोलत होते. संभाजीनगर, नगर आणि जालना या जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी एकदिवसीय प्रांतीय हिंदू अधिवेशन घेण्यात आले. व्यासपिठावर धर्मयोद्धा संघटनाचे उपाध्यक्ष श्री. कैलास कुर्हाडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत देशमुख आणि कु. प्रियांका लोणे उपस्थित होत्या. या अधिवेशनाला ५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्माभिमानी उपस्थित होते.
साधू-संत यांच्या आशीर्वादाने वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच ! – श्री कैलास कुर्हाडे, उपाध्यक्ष, धर्मयोद्धा संघटना
छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज निर्माण करण्यासाठी जो संघर्ष करावा लागला, तसाच संघर्ष आपल्यालाही करावा लागणार आहे. श्रीकृष्णाने जसा गोवर्धन पर्वत उचलला, तेव्हा गोपगोपींनी आपापल्या काठ्या लावल्या. त्याचप्रमाणे आपणही हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होणे, ही काळानुरूप आपली साधनाच आहे. साधू-संत यांच्या आशीर्वादाने वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे.
सनदशीर मार्गाने प्रयत्न केल्यावर मशिदींवरील अवैध भोंगे उतरवता येतात ! – अधिवक्ता श्री. सुरेश कुलकर्णी
सध्याच्या कायद्यानुसार मशिदींवरील भोंगे आतल्या दिशेने असायला हवेत. या भोंग्यांच्या विरोधात तक्रार दिली जात नाही. सनदशीर मार्गाने प्रयत्न केल्यावर मशिदींवरील अवैध भोंगे उतरवता येतात. सर्व कायदे केवळ आणि केवळ हिंदूंच्या सणांनाच लावले जातात. गणेश मंडळाची तक्रार ही ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते. मग बाकीच्या तक्रारी का घेतल्या जात नाहीत ? आज आपण संघटित नसल्याने हिंदूंना ही बंधने घातली जात आहेत. हे जाणून हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे.
लव्ह जिहादविषयी प्रत्येकाने जागृत रहा ! – श्री. अमित कुलकर्णी, पेशवा संघटना, जिल्हा अध्यक्ष, जालना
संभाजीनगरमध्ये प्रथम प्रेमाच्या जाळ्यात अडकवून नंतर छायाचित्रे काढून तरुणींना धर्मांधांकडून फसवले जाते. हेच धर्मांध त्यांच्याशी निकाह करतात. लव्ह जिहादचे गांभीर्यच आपल्यात नाहीत. प्रत्येकाने लव्ह जिहादाविषयी जागरूक राहून आपल्या मुली या जाळ्यात कशा अडकणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे.
प्रांतीय हिंदू अधिवेशनामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती ! – कु. प्रियांका लोणे, हिंदु जनजागृती समिती
हिंदु राष्ट्र हे केवळ मत नसून अखंड आचरण्याचे व्रत आहे. प्रतीवर्षी राष्ट्रीय स्तरावर, तसेच स्थानिक स्तरावर संपूर्ण भारतभर निरनिराळ्या ठिकाणी हिंदू अधिवेशन घेण्यात येते, याची फलनिष्पत्ती म्हणून २२ राज्यांतील २५० संघटनांचे संघटन झाले. ते सर्व जण हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करत आहेत.
राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी महिलांनी रणरागिणी व्हायला हवे ! – कु. प्रतिक्षा कोरगावकर, रणरागिणी
जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार करून त्यांना हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यास साहाय्य केले, तसेच भवानीमातेची साधनाही शिकवली; पण आज परिस्थिती पालटली आहे. आज प्रत्येक स्त्रीला धर्मशिक्षण नसल्यामुळे बिकट स्थिती निर्माण झाली आहे. ती पालटण्यासाठी महिलांना राष्ट्र आणि धर्म यांचे शिक्षण देण्याची आवश्यकता आहे.
प्रभावी संघटन हवे ! – संतोष पंडुरे, गोरक्षक, नेवासा
आज पोलीस गोरक्षकावरच गुन्हे प्रविष्ट करत आहेत. गोरक्षण करतांना कायदेशीर गोष्टींचा अभ्यास करून कृती केल्यास त्याची अधिक फलनिष्पत्ती मिळेल. आपण आपली शक्ती वाढवली पाहिजे. आपले संघटन प्रभावी बनवले पाहिजे. तसे झाल्यासच आपल्याला हवे तसे यश संपादन करता येईल.
साधनेने आत्मबळ वाढवून धर्माच्या कार्यात हातभार लावूया ! – श्री. अभिजीत देशमुख, हिंदु जनजागृती समिती
साधना न केल्यामुळे धर्माची महानता लक्षात येत नाही. हिंदु धर्म जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सोडवत असल्याने आपल्याला त्याविषयी कृतज्ञता वाटली पाहिजे. साधनेमुळे व्यक्ती धर्मनिष्ठ होते. जीवनातील कठीण प्रसंगांत साधनेमुळे स्थिर राहून योग्य निर्णय घेता येतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे, उदा. बाजीप्रभू देशपांडे हे कठीण प्रसंगात योग्य निर्णय घेऊ शकले. श्रीकृष्णाची उपासना करून आत्मबळ वाढवूया आणि धर्मसंस्थापनेच्या कार्यात हातभार लावूया.
प्रांतीय हिंदू अधिवेशनातील ठराव
१. विश्वकल्याणासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी वैध मार्गाने जे जे प्रयत्न करणे आवश्यक आहे, ते सर्व हे प्रांतीय हिंदू अधिवेशन करील. भारतीय संसदेने देशाला हिंदु राष्ट्र घोषित करावे.
२. केंद्रशासनाने संपूर्ण देशात गोहत्या बंदीचा कायदा तात्काळ करावा आणि त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी.
३. विस्थापित काश्मिरी हिंदूंचे पुनश्च जम्मू-काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्यात यावे.
४. नास्तिकतावाद्यांच्या हत्यांच्या प्रकरणी तपास यंत्रणांकडून सनातन संस्थेच्या निष्पाप साधकांचा छळ होऊ नये, यासाठी केंद्रशासनाने कृती करावी.
उपस्थित संघटना आणि पक्ष
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, वारकारी संप्रदाय, धर्मयोद्धा संघटना, हिंदु रक्षा समिती, युवा सेवा संघ, शिवसेना, श्री संप्रदाय, पतंजली युवा समिती, छावा युवा संघटना, गणेश मंडळ घारेगांव, तंटामुक्ती समिती गाडेवाट, अखिल भारतीय छावा संघटना, हिंदु विधीज्ञ परिषद, रणरागीणी शाखा आणि सनातन संस्था
प्रांतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या ५०हून अधिक संघटनांचे प्रतिनिधी आणि धर्मप्रेमी यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार केला. विशेष म्हणजे राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या उपक्रमांसह यापुढे सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्धार अधिवेशनातील हिंदुत्वनिष्ठांनी केला.तसेच काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करण्यासाठी राष्ट्रव्यापी आंदोलन उभारण्याचा निर्धारही करण्यात आला. या संघटना संस्कृतीरक्षण, गोरक्षा, हिंदूंच्या मानबिंदूंचे रक्षण, धर्मांतर आणि लव्ह जिहाद या समस्यांविषयी प्रबोधन आदी क्षेत्रांत कार्य करत आहेत. याच कार्याला अधिक गती देण्याचा प्रयत्न या अधिवेशनाद्वारे करण्यात आला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात