कर्नाटक राज्यात प्रस्तावित अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीची बेंगळुरू येथे पत्रकार परिषद !
बेंगळुरू : काँग्रेस सरकार म्हणते हिंदूंच्या प्रथा अंधश्रद्धा आहेत. त्यांनी यासाठी शृंगेरी, पेजावर, सिद्धगंगा या मठांच्या प्रमुखांशी चर्चा करावी. केवळ कायद्याची पदवी घेतल्याने व्यक्ती बुद्धीवंत होत नाही. राजकीय नेते एका वेळी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या गोष्टी करतात आणि दुसर्या वेळी हातात लिंबू घेऊन वाईट शक्तींचे निर्मूलन करतात. हा निव्वळ ढोंगीपणा आहे, अशी टीका अधिवक्ता अमृतेश एन्.पी. यांनी केली. कर्नाटक राज्यात काँग्रेस सरकारकडून प्रस्तावित असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २०१६ ला विरोध करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेत नादागोकुल आश्रमाच्या माता रत्नाम्मा, श्री. रामाकोतेश्वरानंद स्वामी, श्री. रत्नकुमारस्वामी, श्री. व्यंकटेश रेड्डी स्वामी, सीताराम आश्रमाचे श्री. रामस्वामी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा आदींनी विषय मांडला.
काँग्रेस सरकार एकाच्या डोळ्यात लोणी, तर दुसर्याच्या डोळ्यात चुना टाकते ! – डॉ. महर्षी आनंद गुरुजी
काँग्रेस सरकार बुद्धीवाद्यांच्या आहारी जाऊन पुढील पिढीला संस्कृतीपासून दूर नेत आहे, ही खेदाची गोष्ट आहे. त्यामुळेच हिंदु समाजाच्या संरक्षणासाठी संत या कायद्याला विरोध करत आहेत. सध्या शेतकर्यांच्या आत्महत्या होत आहेत, सीमेवर लढतांना सैनिक हुतात्मा होत आहेत, अशा अनेक प्रश्नांना बगल देऊन सरकार अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पारित करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
हिंदूंच्या प्रथांना लक्ष्य केल्यास संत समाज गप्प बसणार नाही ! – श्रीशक्ती शांतानंद महर्षी स्वामी धर्मशास्त्रगिरी
हिंदूंच्या प्रथा-परंपरा या शास्त्रीय आहेत. त्या ग्रहस्थानांवर अवलंबून असतात. राजकीय पक्षांना मात्र हे समजत नाही. ते केवळ एकगठ्ठा मताचा विचार करतात. हिंदूंचे संत या कायद्याला विरोध करण्यासाठी देहलीपर्यंत जातील.
या कायद्यात इस्लाम आणि ख्रिस्ती यांच्या प्रथा-परंपरांना हात लावण्यात आलेला नाही ! – मोहन गौडा
काँग्रेस सरकारने हा कायदा सिद्ध करतांना प्रा. नटराज, डॉ. ललिता नायक, डॉ. नरेंद्र नायक, सारा अबू बेकर, बनू मुश्ताक अशा हिंदूविरोधी व्यक्तींचे साहाय्य घेतले. हा कायदा केवळ हिंदूंच्या प्रथा-परंपरा यांच्या विरुद्ध आहे. त्यात हिंदूंच्या सर्व विधींना अवैध ठरवण्याचे प्रावधान आहे; मात्र इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मातील प्रथा परंपरांना हात लावण्यात आलेला नाही. यात अंधश्रद्धा शब्दाची व्याख्या दिलेली नाही. या कायद्याने हिंदूंना ब्लॅकमेल केले जाऊ शकते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात