Menu Close

पन्हाळागडावर अवतरली पुन्हा एकदा शिवशाही !

कोल्हापूर –  तीन दरवाजातून बाहेर पडणारे सोसाट्याचे वारे… हातामध्ये मशाली घेऊन मावळ्यांचा एक जथ्था…‘गडावर राजे आले,’ अशी दवंडी पिटली. ‘हर हर महादेव’च्या जयघोषामध्ये छत्रपती शिवाजीराजे घोड्यावरून अवतरले. जणू इतिहासाची पुनरावृत्ती किल्ले पन्हाळागडावर सोमवारी सांयकाळी पाहण्यास मिळाली. निमित्त होते ‘शिवपदस्पर्श’ दिनाचे.

शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाचा वध केला आणि २८ नोव्हेंबर १६५९ ला दख्खन दौलत ‘पन्हाळगडा’सारखा महत्त्वाचा दुर्ग जिंकला. त्याच दिवशी शिवरायांनी मशालीच्या उजेडात ‘पन्हाळगड’ पाहिला. या प्रेरणादायी इतिहासाची ओळख सर्वांना व्हावी. या उद्देशाने शिवप्रेमींच्यावतीने या दिवसाचे औचित्य साधून ‘शिवपदस्पर्श दिन’ सोहळा गेल्या काही वर्षांपासून साजरा केला जातो आहे.

panhala-fort

शिवपदस्पर्श दिनानिमित्त तीन दरवाजा येथे आकर्षक रांगोळीसह फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. तसेच पणत्या लावून हा परिसर प्रकाशमय केला होता. आकर्षक विद्युत रोषणाईने तीन दरवाजा आणखीनच उजाळला. हा सोहळा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. याचवेळी साडेसातच्या सुमारास ‘अरे… राजे आले, अशी दंवडी पिटली’…आणि ‘जय शिवाजी, जय भवानी’, ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. जमलेल्या शेकडो लोकांनी श्वास रोखून धरला आणि मशालींच्या उजेडात मावळे, त्या पाठोपाठ घोड्यावर बसलेले शिवरायांच्या वेषामध्ये हर्षल सुर्वे यांनी कोकण दरवाजातून तीन दरवाजाच्या मधल्या चौकात प्रवेश केला.

मशालीच्या उजेडात महाराजांच्या चेहऱ्यावरील अनोखे तेज उजाळून निघाले. महाराजांवर पुष्पवृष्टी होऊ लागली. त्याचवेळी सुहासिनींनी औक्षणं केले. मुजरे झडले आणि हलगीच्या कडकडाटामध्ये मावळ्यासोबत महाराज अंबरखान्यात आले आणि बारकाईने किल्ला न्याहाळत होते. हा अनोखा सोहळा पाहताना जुने राजे पुन्हा एकदा पन्हाळागडावर अवतरले, असा भास होत होता. अशा वातावरणात आजचा ‘शिवपदस्पर्श दिना’चा सोहळा संपन्न झाला.

दरम्यान, खंडोबा वेताळमाळ तालमीतील मर्दानी राजा सुहास ठोंबरे आखाड्याने यावेळी सादर केलेल्या मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांसह भालदार, चोपदार, मावळे यांच्या दर्शनाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. आझाद नायकवडी यांनी आपल्या पोवाड्यांच्या माध्यमातून हा ज्वलंत इतिहास सर्वांच्या समोर पुन्हा एकदा जिवंत उभा केला. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी या उपक्रमामागील पार्श्वभूमी सांगितली. त्यानंतर पुरातत्त्व खात्याचे गणेश खोडके यांचे व्याख्यान झाले.

यावेळी वसंतराव मुळीक, जयेश कदम, गणी आजरेकर, किरणसिंह चव्हाण, शंकरराव शेळके, सागर पाटील, सुनील आडसुळे, प्रसाद मोहिते, मनजित माने, अमित अडसुळे, उत्तम नलवडे, प्रशांत पाटील, अवधूत पाटील, उत्तम नलवडे, प्रसाद पाटील, किरण चव्हाण, इंद्रजित माने, कावेरी कुडवे, श्वेता जाधव, सृष्टी जाधव यांच्यासह पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्त्रोत : लोकमत

Tags : Hinduism

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *