मिरज : देशभरात सध्या पाश्चात्य प्रथांच्या वाढत्या अंधानुकरणामुळे नववर्ष गुढीपाडव्याच्या जागी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजता साजरे करण्याची कुप्रथा मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. बीभत्स गाण्यांच्या तालावर अश्लील अंगविक्षेप करून नाचणे, शिवीगाळ करणे, मुलींची छेडछाड करणे आदी कुकृत्ये करून एकूणच कायदा अन् सुव्यवस्था यांच्या दृष्टीने गंभीर स्थिती निर्माण होत आहे. हे गैरप्रकार रोखण्यासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे, गड-किल्ल्यांसारख्या ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान-धूम्रपान आणि पार्ट्या करणे यांस प्रतिबंध करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन मिरज शहरात प्रांत कार्यालयात देण्यात आले.
या वेळी शिवसेनेचे श्री. आनंद राजपूत, हिंदुत्वनिष्ठ श्री. सतीश तोडकर, श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. चिदंबर करकल यांसह सनातन संस्था, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी देण्यात आलेली अन्य निवेदने
१. आतंकवादाला खतपाणी घालणार्या डॉ. झाकीर नाईक यांचे प्रत्यार्पण करून भारतात आणा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करा.
२. कर्नाटक आणि केरळ येथे साम्यवादी आणि धर्मांध यांच्याकडून होणार्या हिंदु नेत्यांच्या हत्या आणि या आक्रमणांमागील षड्यंत्राचा ‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणे’कडून सखोल तपास करून त्याची पाळेमुळे खणून काढा !
३. बंगालमध्ये अनेक गावांत दंगली घडवणार्या आणि हिंदूंवर अत्याचार करणार्या धर्मांधांवर कारवाई करा !
वरील तीन मागण्यांची निवेदने सांगली, विटा, तसेच शिरोळ या ठिकाणीही देण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात